चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण माहितीये का? पण दोन भारतीयांनी त्याला टाकलंय मागे, ते दोघे कोण आहेत?

बुधवारी ब्लूमबर्गच्या यादीत बाईटडान्सचे संस्थापक 57.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर होते. त्यांनी 2012 मधे बीजिंगमधील चार बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये बाईटडान्सची स्थापना केली होती.   

शिवराज यादव | Updated: Mar 27, 2025, 09:54 PM IST
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण माहितीये का? पण दोन भारतीयांनी त्याला टाकलंय मागे, ते दोघे कोण आहेत?

टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडान्स लिमिटेडची स्थापना करणारे झांग यिमिंग (Zhang Yiming) आता चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असल्याचं वृत्त ब्लूमबर्गने दिलं आहे. बाईटडान्सचे संस्थापक बुधवारी ब्लूमबर्गच्या यादीत अव्वल स्थानावर होते, त्यांची संपत्ती 57.5 अब्ज डॉलर्स आहे. यासह त्यांनी झोंग शानशान (Zhong Shanshan) आणि टेन्सेंट होल्डिंग्जचे सह-संस्थापक मा हुआतेंग (Tencent Holdings co-founder Ma Huateng) यांना मागे टाकलं आहे. 

मुकेश अंबानी आणि गौतम अदानींनंतर झांग यिमिंग यांचा क्रमांक

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झांग यिमिंग आता आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी दोन भारतीयांचा नंबर आहे. हे भारतीय दुसरं तिसरं कोणी नसून रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी आहेत. 

मुकेश अंबानी 90.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर गौतम अदानी 72.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टिकटॉक संस्थापकांच्या संपत्तीत 10  अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गुंतवणूकदरारांनी "ब्लॅकरॉक इंक. (BlackRock Inc), फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स (Fidelity Investments) आणि टी. रो प्राइस ग्रुप इंक. (T. Rowe Price Group Inc.) यांचं मूल्यांकन आणि 312 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर कर्मचारी स्टॉक परत खरेदी करण्याच्या कंपनीच्या योजनेमुळे संपत्तीत वाढ झाली आहे. 

Zhang Yiming कोण आहेत?

अमेरिकेने त्यांच्या प्रमुख अॅपला ब्लॉक करण्याच्या धमक्या दिल्यानंतर झांग यिमिंग यांनी जबरदस्त पुनरागमन केलं आहे. 41 वर्षीय यिमिंग यांनी 2012 मध्ये बीजिंगमधील चार बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये बाईटडान्सची स्थापना केली. न्यूज अ‍ॅग्रीगेटर टाउटियाओ आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक डेव्हलप केलं. हे अॅप प्रसिद्ध ठरलं आणि झांग यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या श्रेणीत आणलं.

झांग यिमिंग 2021 मध्ये बाईटडान्सच्या सीईओपदावरुन पायउतार झाले. पण रॉयटर्सनुसा, अद्यापही त्यांच्याकडे बाईटडान्समधील 50 टक्के मतदान हक्क आहेत. 

1983 मध्ये चीनमधील फुजियानमधील लोंगयान येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. ते त्यांच्या पालकांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांनी तियानजिनमधील नानकाई विद्यापीठातून मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली.

2012 मध्ये बाईटडान्सची स्थापना करण्यापूर्वी, झांग यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काही काळ काम केले. पण कठोर कॉर्पोरेट नियमांमुळे त्यांनी नोकरी सोडली. 2015 मध्ये त्यांनी बाईटडान्सचे व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक लाँच केले. हे अॅप जगभरातील तरुणांमध्ये लोकप्रिय झालं.

2018 च्या अखेरीपासून, बाईटडान्सच्या मोबाइल अॅप्सवर एक अब्जाहून अधिक मासिक वापरकर्ते आहेत. 2013 मध्ये फोर्ब्सच्या 30 अंडर 30 यादीत त्यांना स्थान मिळालं होतं. टाइम मासिकाच्या 2019 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता.