....आणि पाहता पाहता समुद्रातच भडकली आग; व्हिडीओ Viral
समुद्राच्या मधोमधच अचानक आग लागल्यानं एकच खळबळ माजली
मेक्सिको : मेक्सिकोमध्ये युकाटन येथे समुद्रामध्ये पश्चिम भागात समुद्राच्या मधोमधच अचानक आग लागल्यानं एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीनं आग विझवण्यासाठी पावलं उचलली गेली.
मेक्सिकोतील तेल कंपनी, पेमेक्स (Pemex)नं दिलेल्या माहितीनुसार समुद्रात लागलेली आग आता विझवण्यात आली आहे. पाण्याखाली असणाऱ्या पाईपलाईनमधून वायुगळती (Gas Leak ) झाल्यामुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर आगीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लाव्हारसाप्रमाणं समुद्रात आग भडकल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. नेटकऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचताच त्यांनी याला विविध नावं देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पेमेक्य ऑईल प्लॅटफॉर्मपासून काहीच अंतरावर ही आग लागली. जवळपास पाच तासांसाठी प्रयत्न घेतल्यानंतर ही आग विझवण्यात यंत्रणांना यश मिळालं.
दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीत हानी नाही...
'रॉयटर्स'च्या माहितीनुसार पाण्याखाली असणाऱ्या पाईपलाईनमध्ये ही आग सुरु झाली. ही पाईपलाईन, पेमेक्सच्या ऑईल डेव्हलपमेंटशी जोडली गेलेली आहे. या दुर्घटनेमध्यो कोणत्याही प्रकारटी जिवीत हानी झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
पेमेक्स आणि दुर्घटना हे एक समीकरण
समुद्रात उसळलेली ही आग आणि तिचं एकंदर स्वरुप पाहता, आग लागण्यामागचं मुळ कारण शोधण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधीही पेमेक्सशी निगडीत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. दरम्यान, ही आग लागल्यानंतर 12 इंचांचा व्यास असणाऱ्या या पाईपलाईनचा वॉल तातडीनं बंद करण्यात आला.