नवी दिल्ली - मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमधील निवडणुकीत यश मिळवून भाजपला सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भोपाळ, जयपूर आणि रायपूर या तिन्ही राजधानींच्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या घराबाहेर फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष केला. परदेशात राहणाऱ्या सेलिब्रिटिनीही काँग्रेस नेतृत्त्वाचे कौतुक केले आहेत. नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेले मद्यव्यावसायिक विजय मल्ल्याही यात मागे नाहीत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सचिन पायटल आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले. हे दोघेही काँग्रेसचे यंग चॅम्पियन्स असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोघांनी गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागांत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. शेतकऱ्यांमध्ये राज्यातील सरकारविरोधात असलेल्या रोषाचा निवडणुकीत परिणामकारक वापर करून घेण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.



बॅंकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनमधील वेस्टमिनिस्टर कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच त्यांना भारतात आणले जाऊ शकते. कोर्टाने हे प्रकरण ब्रिटनमधील सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे दिले असून, ते पुढील निर्णय घेतील. मल्ल्या या संदर्भात पुन्हा अपीलही करू शकणार आहेत. मल्ल्यांना भारतात कधी आणले जाते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्ल्या यांना भारतात आणल्यावर मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या कारागृहात विशेष सुरक्षा असलेली एक बराक सज्ज ठेवण्यात आली आहे. या बराकीबाहेर डॉक्टरांचे एक पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. 


ब्रिटनमधील सेक्रेटरी ऑफ स्टेटचे मंत्री साजिद जाविद हे मल्ल्यांच्या पत्यार्पणासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी भारतीय तपाय यंत्रणांचे एक पथक ब्रिटनमध्ये गेले आहे.