saturn planet rings general knowledge : अवकाश किंवा अंतराळ हा विषय आता अनेकांसाठीच आवडीचा विषय ठरत असून, या अनोख्या विश्वातील असंख्य घडामोडींवर सर्वांचच लक्ष असल्याचं पाहायला मिळतं. पृथ्वी, सूर्यमाला, चंद्र, सूर्य या आणि अशा अनेक संज्ञा हल्ली अनेकदा वापरात आणि बोलण्यात येतात. अशाच या अंतराळात आपल्या सूर्यमालेतील एका ग्रहासंदर्भातील अतीव महत्त्वाची आणि तितकीच नजर रोखणारी माहिती नुकतीच समोर आली आहे.
ही माहिती आहे शनी या सूर्यमालेतील कायमच चर्चेच असणाऱ्या ग्रहाची. गुरू ग्रहानंतर आकारानं सर्वात मोठा ग्रह म्हणून शनी गणला जातो. अशा या ग्रहाची निर्मिती हायड्रोजन आणि हेलियमनं झाली असून, त्याचा व्यास आहे 116500 किमी. शनी सूर्यमालेतील सर्व ग्रहांमध्ये जरा जास्तच चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे या ग्रहाभोवती असणारी कडी.
साधारण 1610 मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओनं शनिभेवती असणारी ही कडी आपल्या दुर्बिणीच्या माध्यमातून पाहिली. पण, त्याची सविस्तर माहिती मात्र मिळू शकली नाही. या अद्भीत शोधानंतर जवळपास 50 वर्षांनी शनी या ग्रहाभोवती असणारी रचना प्रत्यक्ष कडी असल्याचा निष्कर्ष क्रिस्टीयान हुगेन्स यांनी लावला.
पुढे हे एकच कडं नसून त्यात ठराविक अंतरावर इतर कडी आहेत याचा शोध जिओवानी कॅसिनी यांनी लावला. आतापर्यंत शनीभोवती 7 कड्या असून त्यांना A, B, C, D, E, F, G अशी नावं देण्यात आली आहे. ही कडी बर्फकणांपासून तयार झाली असून, त्यांचं वय 40 कोटी वर्षे इतकं असल्याचं म्हटलं जातं. या हिमकणांचा आकार अगदी लहानशा ज्वारीपासून ते अगदी मोठ्या खडकांइतका आहे. नासाच्या निरीक्षणानुसार कैक कोटी वर्षांपूर्वी दोन बर्फाळ चंद्र एकमेकांवर आदळून त्यातूनच निर्माण झालेल्या हिमकणांपासून शनीभोवती ही कडी तयार झाली.
23 मार्चपासून शनीची कडी दिसेनाशी होणार आहेत ही कायमस्वरुपी प्रक्रिया नसून नोव्हेंबर महिन्यात ही कडी पुन्हा दिसण्यास सुरुवात होईल. यासाठी एक खगोलीय घटनाच कारणीभूत असून ही कडी न दिसण्याच्या प्रक्रियेला 'रिंग प्लेन क्रॉसिंग' असं म्हटलं जातं. सोप्या शब्दांत सांगावं तर, शनीकडे पृथ्वीवरून कोणच्या कोनामध्ये पाहिलं जातंय यावर ही प्रक्रिया अवलंबून असते असं जाणकार सांगतात.
सूर्यप्रकाश शनीच्या कड्यांवर पडत असल्या कारणानं अनेकदा ही कडी खालून किंवा वरून पाहता येतात. मात्र Saturnian Equinox काळात सूर्यप्रकाश थेट शनीच्या विषुववृत्तावर पडून त्यामुळं हा प्रकाश त्याभोवतीच्या रिंगणावरही परावर्तित होतो आणि यामुळं शनी दिसत असला तरीही पृथ्वीवरून त्याभोवती असणारी कडी मात्र पाहता येत नाहीत. साधारण दर 15 वर्षांतून ही घटना घडत असते, ज्यामुळं 2038 मध्ये आता ही कडी दिसेनाशी होतील. इतकंच नव्हे, तर 30 कोटी वर्षांनंतर मात्र शनीची ही कडी कायमस्वरुपी नष्ट होतील.