Year Ender 2024 : गुगलनं दरवर्षीप्रमाणं यंदाही वर्षाचा शेवट होत असताना वर्षभरात नेटकऱ्यांनी या सर्च इंजिनच्या माध्यमातून नेमकं काय काय सर्च केलं, कोणते प्रश्न इथं मांडले याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. जाणून आश्चर्य वाटेल पण, पर्यटनासाठी भारतीयांची कोणत्या ठिकाणाला पसंती आहे हेसुद्धा या अहवालपर माहितीतून समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वर्षी लेह लडाख किंवा हिमाचल नव्हे, तर काही अनपेक्षित ठिकाणांविषयीची माहिती भारतीयांनी मिळवत तिथं भटकंतीसाठी जाण्याचा पसंती दिली. हीच त्या ठिकाणांची यादी...
कमालीचा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकीकरणामुळंच अझरबैजान या ठिकाणाचं भारतीयांना प्रचंड कुतूहल. बाकू इथं असणारी स्कायलाईन, तिथं असणारी प्राचीन अग्यारी आणि तत्सम मंदिरं येथील आकर्षणाचा केंद्रबिंदू.
भारतीय पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी असणारं आणखी एक ठिकाण म्हणजे बाली. निळाशास समुग्र, पांढरी वाळू आणि नजर जाईल तिथं भारावणारा निसर्ग ही येथील प्रमुख वैशिष्ट्य. अध्य़ात्मिकतेकडे कल असणाऱ्यांपासून साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी बाली एक उत्तम ठिकाण.
हिमाचल प्रदेशस्थित मनाली हे तिथं असणाऱ्या पर्वतरांगांसमवेत हिवाळ्यात इथं होणाऱ्या हिमवृष्टीसाठी ओळखलं जातं. बर्फाच्छादित मनालीचं प्रत्येक रुप भारावणारं.
यंदाच्या वर्षी पर्यटकांच्या यादीत कझाकस्तानचा प्रवेश काहीसा अनपेक्षितच. अल्माटीपासूनची वाट, निसर्गानं अद्भूत चमत्कार दाखवावा असे सूर्यास्त आणि आधुनिक युगासमवेत एका वेगळ्यात विश्वास नेणारं असं हे ठिकाण.
भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारं राजस्थानमधील एक ठिकाण आहे जयपूर. अम्बेर, नाहरगढ, हवा महल आणि जयपूरमधील बाजार ही इथं लक्ष वेधणारी ठिकाणं.
ही झाली यादीतील पहिली पाच ठिकाणं. त्यामागोमागत अनुक्रमे जॉर्जिया, मलेशिया, अयोध्या, काश्मीर आणि दक्षिण गोवा या ठिकाणांविषयीसुद्धा भारतीयांनी गुगलवर विविध सर्च केले. थोडक्यात भारतीयांच्या Travel Bucket List मध्ये काही नावं नव्यानं जोडली गेली, तर काही ठिकाणं मात्र साचेबद्धरित्या त्यांच्या स्थानी कायम असल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही यादीतील कोणत्या ठिकाणाविषयी सर्च केलं होतं? गुगलनं हेरलीये ना तुमच्या मनातील बाब?