'अरनमानाई 4 हिंदीतही डब होणार; २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

'अरनमानाई ४'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. 

Updated: May 16, 2024, 01:37 PM IST
'अरनमानाई 4 हिंदीतही डब होणार; २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला... title=

मुंबई : मागील काही दिवसांपासून 'अरनमानाई ४' या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 'अरनमानाई ४' जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी 'अरनमानाई ४' हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले असून, आता हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यास सज्ज झाला आहे.

'अरनमानाई ४'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा 'अरनमानाई ४' पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.

आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. ई. कृष्णसामी यांची सिनेमॅटोग्राफी आणि हिप-हॉप तमिझाद्वारे तयार केलेल्या हळूवार साउंडट्रॅकमुळे चित्रपटातील रहस्यमय वातावरण अधिकच गडद बनते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.

दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या 'अरनमानाई ४' या चित्रपटाने केवळ व्यावसायिक पातळीवर यश संपादन केले नसून, भारतीय सिनेमाच्या कथाकथन क्षमतेच्या कक्षाही रुंदावण्याचे काम केले आहे. रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने 'अरनमानाई ४' हिंदीत डब करण्यात आला आहे. अनोख्या आणि शक्तिशाली कथा सिल्व्हर स्क्रीनवर आणण्यासाठी कार्मिक फिल्म्स ही निर्मितीसंस्था ओळखली जाते. २४ मे रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन 'अरनमानाई ४' पाहायला विसरू नका. मोठे डाव आणि अशांत आत्मे असलेल्या एका अलौकिक प्रवासासाठी सज्ज व्हा.