Bhau Kadam on his and Ashok Sharaf Viral Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमांपैकी एक हा 'चला हवा येऊ द्या' आहे. या कार्यक्रमातून कलाकारांनी स्वत: ची एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यापैकी एक म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या सोशल मीडियामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भाऊ कदम यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेतली होती. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अशोक सराफ यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावर आता भाऊ कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाऊ कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. त्यात एक व्हिडीओ होता. या व्हिडीओत त्यांची आणि अशोक सराफ यांनी कशी भेट झाली त्यांच्यात काय बोलणं झालं हे पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओला पाहिल्यानंतर मामांनी किमान भाऊंना बसायला सांगायला हवं होतं. हे अशा अनेक प्रतिक्रिया त्यांच्या व्हिडिओवर आल्या होत्या. 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांना या विषयी विचारण्यात आलं. तर तेव्हा ते म्हणाले की 'त्यांना फ्रेम बघून वाटलं असेल काही पण प्रसंग असा घडला होता पहिला की माझा प्रयोग होता आणि अशोक मामा आले होते. माझ्या प्रयोगानंतर त्यांचा प्रयोग होता. मी मेकअप काढत होतो आणि मला एकाने सांगितलं की अरे मामा आलेत. मला जायचं होतं चला हवा येऊ द्याच्या रिहर्सलला. मी म्हणालो पटकन भेटून येतो. मी घाईघाईत गेलो. मी पाया पडलो, ते बसले होते, मी म्हणालो कसे आहात ना, बरं चाललंय ना? म्हणाले हो. सोमवार मंगळवार रिहर्सल आहे कसं करता तुम्ही हे, एवढीच चर्चा झाली. मामांशी गप्पा मारायला नव्हतो गेलो, मलाच घाई होती. हा प्रसंग आहे आणि मी निघालो पाया पडून. पण लोकांना काय वाटलं हे मला कळलंच नाही खरं तर. आणि त्यांच्यासमोर कोण बसू शकतं?'
हेही वाचा : Krrish 4 मध्ये पुन्हा एकदा होणार 'जादू'ची एन्ट्री, तर प्रियांकांची जागा घेणार 'ही' अभिनेत्री
पुढे याविषयी सांगत भाऊ कदम म्हणाले, 'ते एक खूप मोठे कलाकार आहे, महान कलाकार आहेत. त्यांना बघत आम्ही शिकलो, त्यांनी इतिहास घडवलाय. ते आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यासमोर बसणं हे फारच आहे. कुणालाच इच्छा होणार नाही. जशी मला झाली नाही. हा तेच जर घरी असतो त्यांच्या तर त्यांनी मला नक्की बसवलं असतं, चहापाणी दिलं असतं. हे मी खात्रीने सांगतो. मी घाईत होतो, थिएटरला होतो, प्रयोग होते लोकांची गर्दी होती. पटकन भेटून मी गेलो. कृपया असं काही बोलू नका, खरं विचारा तरी एकदा, मग तुम्ही रिअॅक्ट व्हा. कृपया असं करू नका. गैरसमज होतो आणि मामांबद्दल खूप आदर आहे . सॉरी पण असं करू नका.'