Vikas Patil Mumbai Local Instagram Post : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून विकास पाटीलला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि नाटकात काम केले आहे. विकास हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. सध्या विकास हा एका नाटकात व्यस्त आहे. या नाटकाच्या प्रयोगाला वेळेवर पोहोचता यावं यासाठी त्याने चक्क मुंबई लोकलने प्रवास केला. याचा एक अनुभवही विकास पाटीलने सांगितला आहे.
विकास पाटीलला बिग बॉस मराठीमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच विकासने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तो मुंबई लोकलमधून प्रवास करताना पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लोकल प्रवासाचा अनुभवही सांगितला आहे.
"नाटकाच्या निमित्तानं खूप साऱ्या गोष्टी नव्यानं try करता आल्या ज्या कधी काळी करत होतो किंवा पहिल्यांदाच करायला मिळाल्या ..त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मंबई लोकल ने प्रवास, मुंबईत सुरुवातीला आलो तेव्हा लोकल हीच lifeline होती, मग कालांतराने bike आली मग कार आणि लोकल शी नातं तुटत गेलं ..
पण ऑल दी बेस्ट च्या निमित्ताने पुन्हा एकदा ह्या lifeline चं महत्व कळलं ..कारण मुंबईत कुठेही वेळेत पोचायचं असेल आणि खास करून प्रयोगासाठी तर लोकल ला पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.. असाच हा एक प्रवास बोरिवली ते चर्नी रोड .. गिरगाव साहित्य संघातला प्रयोग .. ETA 45 minutes", असे विकास पाटीलने म्हटले आहे. त्यासोबतच त्याने मुंबई लोकलचे आभारही मानले आहेत.
दरम्यान सध्या विकास पाटील हा 'ऑल दी बेस्ट' या नाटकात व्यस्त आहे. 'ऑल द बेस्ट' हे नाटक 30 वर्षे जुने आहे. आता जवळपास 15 वर्षांनी हे नाटक रंगभूमीवर परतले आहे. या नाटकाची निर्मिती अनमय प्रोडक्शनतर्फे केली जात आहे. तर याचे लेखन आणि दिग्दर्शन देवेंद्र पेम यांनी केले आहे. या नाटकात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री हे कलाकार झळकत आहेत. सध्या मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत.