क्रिकेटपासून अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

अष्टपैलू लतादीदींबाबतची ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल... वाचून व्हाल थक्क 

Updated: Feb 7, 2022, 06:25 PM IST
क्रिकेटपासून अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन रविवारी झालं. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्या गाण्याच्या आणि खास आठवणींच्या रुपात आपल्या स्मरणात निरंतन राहणार आहेत. हे मात्र नक्की आहे. अगदी राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील दिग्गजांपर्यंत लोकांकडे त्यांचे खास किस्से आहेत. तर सर्वसामान्य माणसांकडे त्यांच्या अनमोल गाण्यांचा ठेवा आहे. 

लता मंगेशकर या उत्तम गायिकाच नव्हता तर त्यासोबत त्यांचं व्यक्तीमत्व हे अष्टपैलू होतं. त्यांना क्रिकेटचीही आवड होती. क्रिकेटपासून ते अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. 

कमी वयात करियरची सुरुवात 

लता मंगेशकर वयाच्या 13 व्या वर्षापासून काम करत होत्या. 1942 रोजी त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झाल्याने त्यांच्यावर घरची जबाबदारी आली. लतादीदी वयाने घरात सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्यावर 4 भावंड आणि आईची जबाबदारी अगदी लहान वयातच पडली. त्यामुळे लतादीदींना काम करावं लागलं. 

अभिनय की संगीत?

लतादीदी सुरुवातील वडिलांसोबत संगीत नाटकांमधून काम करत होत्या. तिथून त्यांना लता हे नाव मिळालं. त्यांनी काही सिनेमांमध्ये देखील भूमिका केली. पण कॅमेऱ्यासमोर खोटं रडणं किंवा हसणं आवडत त्यांना रुचत नव्हतं. इतकंच नाही तर त्यांना सतत मेकअप करून राहाणं पसंत नव्हतं. त्यामुळे लतादीदींनी अभिनय क्षेत्र सोडून पूर्णवेळ संगीत क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. 

लतादीदींना आवडायच्या या खास गोष्टी

लतादीदींना पांढरा रंग खूप आवडायचा. याशिवाय त्यांना नॅट किंग कोल, पॅट बून यांची गाणी खूप आवडायची. त्या एका मुलाखतीमध्ये त्यांचं गाणं गुणगुणल्या होत्या. लतादीदींना क्रिकेट पाहायला खूप आवडायचं. त्यांनी अनेक सामने मैदानावर जाऊनही पाहिले आहेत. 

लतादीदी आणि क्रिकेटचं खास नातं

संपूर्ण मंगेशकर कुटुंबाला क्रिकेटचं वेड आहे. लतादीदींच्या वडिलांची नाटक कंपनी होती. सामनासोबत क्रिकेटचं सामानही जायचं ज्या दिवशी नाटक नसेल त्या दिवशी हे लोक क्रिकेट खेळायचे क्रिकेट आई-वडिलांनाही खूप आवडायचं मी कधी क्रिकेट खेळले नाही पण मला पाहायला आवडायचं असं लतादीदींनी सांगितलं होतं. 

लता मंगेशकर यांचे गुरू कोण?

उस्ताद अमानत अली खान, अमानत खान देवासवाले, पंडित तुलसीदास शर्मा हे लतादीदींचे गुरू होते. याशिवाय त्यांनी अनिल बिस्वास यांच्याकडूनही प्रशिक्षण घेतलं. 

पहिला फिल्म फेअर अॅवॉर्ड

'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी लतादीदींना पहिला पुरस्कार मिळाला होता. 

शाळेत न जाताही 6 डिग्री आणि 35 भाषांमध्ये गायल्या गाणी

घरच्या जबाबदारीमुळे लतादीदींना शाळेत जाणं शक्य नव्हतं. दोन मुलांना शिकण्यासाठी वेगवेगळी फी भरावी लागेल. मात्र त्यावेळी आर्थिक परिस्थिती नसल्याने लतादीदींनी आशा यांना शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कला क्षेत्रात मात्र याची भरपाई आपल्या गाण्यांमधून केली. 35 भाषांमध्ये त्यांनी 30 हजारहून अधिक गाणी गायली. तर त्यांना वेगवेगळ्या 6 विद्यापीठांनी म्युझिक डॉक्टरेटची डिग्री दिली.

नॉनव्हेज खाण्याचा शौक

लतादीदींना नॉनव्हेज खायला खूप आवडायचं. त्यांच्यासाठी खास अनिल बिस्वास नॉनव्हेज डिश तयार करायचे. त्यांची सुरुवातीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या नॉनव्हेज घरी आणू शकत नव्हत्या.

कोणते वादविवाद चर्चेत आले?

एस डी बर्मन यांच्यासोबत लतादीदींना सुरुवातीला काम करणं आवडत नव्हतं. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांचा चेहरा पाहाणंही पसंत केलं नव्हतं. त्यामुळे या वादाची खूप चर्चाही झाली होती. 

लतादीदींच्या त्या गाण्याने पंतप्रधानांच्या डोळ्यातही आलं पाणी

 'ऐ मेरे वतन के लोगों' हे लतादीदींचं गाणं ऐकून त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांनी लतादीदींची या गाण्यानंतर गळाभेट घेतली. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. या गाण्याबद्दल बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नव्हते मात्र डोळ्यातले अश्रू सगळंकाही सांगून जात होते.