जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ' लाईफ लाईन '

आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Updated: May 10, 2024, 05:57 PM IST
जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ' लाईफ लाईन ' title=

मुंबई : क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ' लाईफ लाईन ' या आगामी मराठी चित्रपटाची  नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली असून पोस्टरची झलक आणि शीर्षक पाहाता विषयाची उत्सुकता निर्माण होते ह्यात शंकाच नाही. आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त महानायक अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर अशी तगड्या कलाकारांची फौज आहे. 

साहिल शिरवैकर दिग्दर्शित ' लाईफ लाईन ' ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीत राजेश शिरवैकर यांचे आहेत. अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे तर लालजी जोशी, कविता शिरवैकर, मिलिंद प्रभुदेसाई, संध्या कुलकर्णी, अमी भुता, संचीता शिरवैकर, उदय पंडीत, शिल्पा मुडबिद्री 'लाईफ लाईन' चे निर्माते आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'लाईफ लाईन' चे तरुण दिग्दर्शक साहिल शिरवैकर म्हणतात, " सामाजिक भान आणि व्यावसायिक मूल्यं राखून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. विधात्याने रेखाटलेली तळहातावरची 'आयुष्य रेखा' आपण वाढवू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही ह्या चित्रपटातून केलेला आहे. अनोखी कथा, अनोखा संघर्ष, अनोखी मांडणी,  अनोखी पात्रनिवड आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्यं म्हणता येतील. बाकी अशोक सराफ सर चित्रपटांच्या निवडीबाबत किती चोखंदळ असतात हे सर्वांना माहीत आहेच. त्यांनी आमचा चित्रपट स्विकारला म्हणजे विषय संपला.''