'आईला गमावण्याचे दुःख...', लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक

अभिनेत्यानं शेअर केलेली भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Updated: Jul 29, 2022, 11:51 AM IST
'आईला गमावण्याचे दुःख...', लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत नयन कानविंदे ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित परब याच्या आईचे निधन झाले आहे. गेले काही दिवस अमितच्या आईवर उपचार सुरू होते, मात्र त्यांची ही झुंज अखेरीस अयशस्वी ठरली. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच २० जुलै रोजी अमितच्या आईने अखेरचा श्वास घेत​​ला. अमितनं आपल्या आईच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

अमितनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमितनं आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 'प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईला गमावण्याचे दुःख हे कधीही भरुन न येणारे असते. गेल्या २८ वर्षात तू मला शिकवलेलली मूल्ये आणि नैतिकता यामुळे तू माझ्यात कायमच राहशील. तू खरी लढाऊ आहेस आणि तू मला तसं व्हायला शिकवलंस. हे सगळं सुरळीत होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की, मी तिच्यासाठी दुसर्‍या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे,' असं कॅप्शन अमितनं दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अमित म्हणाला, 'जर मी तुला तुझ्या भल्यासाठी जाऊ दिले नसते, तर ते माझ्यासाठी स्वार्थाचे ठरले असते. मला आनंद आहे की तुला माझा अभिमान वाटेल असं मी करुन दाखवलं. आता इथून पुढे मी पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत नसेन म्हणून कृपया स्वतःची काळजी घे आणि पुरेशी विश्रांती घे. माझ्या पुढच्या जन्मातही माझी आई म्हणून तुला पुन्हा भेटण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. मी पुन्हा तुझ्या गर्भात येण्याची आणि तो क्षण अनुभवण्याची प्रतीक्षा करत आहे. तोपर्यंत कृपया विश्रांती घे. तुझ्या सोनूकडून खूप खूप प्रेम.'

अमितनं त्याच्या आईची सगळी स्वप्न पूर्ण केली. अमितनं एम.बी.ए. केलं आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहे. बाबांची सरकारी नोकरी आणि आई गृहिणी असल्यामुळे घरामध्ये अभिनयाची पार्श्वभूमी नाही. आपली नोकरी सांभाळून तो ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अभिनयाची आवड जोपासताना दिसला. त्याने साकारलेलं नयन रावांचं पात्र विरोधी असलं तरी त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.