'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप

"भारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली. 

नम्रता पाटील | Updated: Apr 21, 2024, 02:05 PM IST
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप title=

Chinmay Mandlekar Wife Video : मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याचे कुटुंब एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. या चर्चांमागचे कारण म्हणजे त्याच्या मुलाचे नाव. चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकरने त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि नेहा मांडलेकर या दोघांनीही मुलाचे नाव जहांगीर का ठेवले, याबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. पण आता वाढत्या ट्रोलिंगमुळे नेहाने एका व्हिडीओद्वारे ट्रोलर्सची तोंड बंद केली आहेत. 

चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना नेहाने भारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने हा व्हिडीओ करण्यामागचे सविस्तर कारण सांगितले आहे. तसेच तिने यात तिची जात, घडलेला सर्व प्रकार, पालक म्हणून असलेले हक्क याबद्दलही सांगितले आहे. 

नेहा मांडलेकर व्हिडीओत काय म्हणाली?

"नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. मी आधीच तुम्हाला माझी जात सांगते, कारण ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. हा व्हिडीओ करण्याचं एकच कारण आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, माझे पती, त्यांचं नाव चिन्मय दिपक मांडलेकर त्यांची जात द्वेष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत. काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एका पॉडकास्टमध्ये एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर आम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. माझे पती हे पब्लिक फिगर आहेत. त्यांचं काम हे रसिक मायबाप पाहतात, ते काम आवडलं तर त्यांना रसिक मायबाप डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की, त्यांनी त्यांची कानउघडणी करावी. कारण कलाकार हा सतत पब्लिक आयमध्ये असतो, जे मान्य आहे. पण सध्या माझ्या पतीच्या कामाबद्दल ट्रोलिंग होतं नाही. तर हे ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरुन होतंय.

माझे पती पब्लिक फिगर आहे म्हणून त्याच्या मुलाच्या नावाचा रस घेऊन चर्वण करायचा हक्क त्यांना नाही. पण लोकांनी तोही ओरबडून घेतला असेल, तर हा व्हिडीओ मुद्दाम मी एवढ्यासाठी करतेय लोकांना आठवण करून द्यायला की, त्या मुलाला एक आईसुद्धा आहे. जी कलाकार नाही. जी पब्लिक आयमध्ये नसते. जी पब्लिक फिगर नाही. तिला आणि तिच्या मुलांची त्यांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे. अनेकदा काय होतं, हल्ली स्मार्टफोन्स किंवा मोबाईलमध्ये टाईप करताना हे विसरतो की, पलीकडे एक माणूस ही गोष्ट वाचणार आहे. हे  सगळं फक्त एखाद्या रोबॉटिक पॉटला वाचावं लागणार नाही. ते एक माणूस वाचणार आहे. ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जातंय, तो एक दहा-अकरा वर्षांचा मुलगा आहे. बरं का ट्रोल होतंय? तर त्याचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ नाव कधी ठेवलं आता सगळंच सांगते. कारण की मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खरंतर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधिल नाही. पण मलाच असं वाटलं की, अज्ञानातून हे ट्रोलिंग होतं असेल. तर माझी ही जबाबदारी आहे अज्ञान दूर करावं. म्हणून हा व्हिडीओ आणि खटाटोप....

“माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013 ला झाला. तुम्ही कॅलेंडर उघडून बघू शकता, 21 मार्चला जमशेदी नवरोज असतो. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं पारसी नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. हा जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. त्याशिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणदायी कुटुंब संस्था आहे. ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला. अनेक पालक आपल्या मुलाचं नाव अर्थ आवडला आणि अर्थपूर्ण ठेवतात. आता या भारतात असलेले प्रत्येक अक्षय याचं नाव काय त्यांच्या पालकांनी अक्षय कुमारवरुन ठेवलं नसेल ना. अक्षय या शब्दाचा अर्थ आवडला असेल. आता सुचवणारे असे ही सुचवतात की, जगज्जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं? किंवा तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं? त्याचेही अर्थ असे होतात. तर तो हक्क असावा ना आम्हाला पालक म्हणून....

बरं दुःख काय आहे, हे मुस्लिम नाव आहे. आपण तो देश आहोत, आपण शतकानु शतके मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र इथे राहतो. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात बघाल तरी आपले सुपरस्टार्स देखील मुसलमान आहेत. क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचा हजार, करोडमध्ये आपणच त्यांना बिझनेस करुन देतो, ते चालतं? माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ सलतं आणि ते किती वर्ष सलणार आहे. माझ्या नवऱ्याने बिट्टा कराटे पात्र साकारलं. तर म्हणतात, रोल फारच सिरियसली घेतला. नाव लगेच मुस्लिम ठेवलं. बिट्टा कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्ष आधी नाव ठेवलं होतं तरीही... आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तर हेच म्हणतात की हा काय स्क्रीनवर जिरेटोप घालतो. पण मुलाचं नाव ‘जहांगीर’चं ठेवलं. तर स्क्रीनवर जिरेटोप घालण्याआधी माझ्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा त्याचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं होतं. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवून आम्ही चूक नाही केली. तो हक्क आम्हाला आहे. 

पण मला हे एक कळलं, महाराजांवर किंवा महाराजांच्या शिकवणीवर कितीही श्रद्धा असली, कितीही प्रेम असलं, आमच्या घरात महाराजांच्या किती प्रतिमा असल्या, बोलताना महाराजांच्या धाडसाचे दाखले आमच्या मुलांना देत असलो तरी या देशात अपुऱ्या आहेत. कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचा अधिकार सगळ्यांकडे नाहीत. ते आमच्याकडे नाही. शिवाय पात्र स्क्रीनवर करण्याचा हक्क नाही. तर यासाठी मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की, आम्ही आमच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असून सुद्धा स्क्रीन महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं. आम्हाला क्षमा करा. आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की, महाराज हे एका नटाच्या नावाच्या पलीकडे आहेत. त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो, आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं.

“आज सकाळीच एक सद्गृहस्थांचा मेसेज आला की, ‘हा देश सोडून जा. तुम्ही अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जाऊन राहा.’ ते वाचलं आणि वाईट वाटलं. अनेक लोक सल्ले देतात, ट्रोलर्स काय मनावर घ्यायचं. पण जसं मी मगाशी बोलले मोबाइलच्या पलीकडे एक माणूस वाचत असतो. तसं हे मी नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे पण एक माणूसच टाईप करतोय. या देशातल्या एका व्यक्तीला, मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा, असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला. याचं मला वाईट वाटलं, याची मला खंत आहे आणि म्हणून हा व्हिडीओ आहे. परत कोणी मला असला सल्ला देऊ नये. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत. जेआरडी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. या व्हिडीओनंतर ट्रोलिंग थांबणार आहे का? तर अजिबात नाही. वाढणार? तर हो, निश्चित दुप्पटीने वाढणार आहे. खूप मेसेज येणार आहेत. पण आता माझ्याकडून मी माझं काम केलं आहे, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. धन्यवाद", असे नेहा मांडलेकरने म्हटले आहे.

सध्या नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओवर चिन्मय मांडलेकरसह मनवा नाईक, गौतमी देशपांडे या कलाकारांनी लाईक केला आहे. तसेच अनेक चाहतेही लाईक्स करत नेहाला पाठिंबा देताना दिसत आहेत.