'आम्ही तारिख आधीच ठरवली आणि या श्रीदेवी प्रसन्न...', पुष्कर जोग निर्मात्यांवर का संतापला?

मराठी चित्रपटांची गाडी या वर्षभरात रुळावर येताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग मराठी सिनेमासृष्टीकडे पुन्हा वळताना दिसतोय.अर्थात यामागे कलाकारांची मेहनत, दिगदर्शकाची जमेची बाजू आणि निर्मात्यांची उत्तम साथ दिसून येते.

Updated: Nov 26, 2023, 06:09 PM IST
'आम्ही तारिख आधीच ठरवली आणि या श्रीदेवी प्रसन्न...', पुष्कर जोग निर्मात्यांवर का संतापला? title=

 'वाळवी', 'बाई पण भारी देवा' यासारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना  पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळवलं असं म्हणता येईल. आता चर्चा सुरु आहे ती म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या मराठी चित्रपटांची. 

नुकतंच अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा सावंत प्रमुख भूमिकेत असलेला 'मुसाफिरा' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हा सिनेमा 2 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण पुष्कर जोगच्या सोशल मीडियावरच्या एका पोस्टनं लक्ष वेधून घेतलंय. मराठीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपटसुद्धा 2 फेब्रुवारीलाच रिलीज होत असल्याची घोषणा काल करण्यात आली. या रिलीज डेटबाबतच पुष्कर जोगनं 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या निर्मात्यांना सोशल मीडियाद्वारे विनंती केल्याची पोस्ट चर्चेत आहे. यामध्ये त्यानं चित्रपटाच्या पोस्टरचा फोटोदेखील शेअर केला आहे.   

हे पोस्ट शेअर करत पुष्कर म्हणाला, 'आम्ही ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख आधीच ठरवली होती आणि या (श्रीदेवी प्रसन्न) चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज जाहीर केली. निर्माते एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत का? एक फोन करा…मेसेज करा…पण यातंल काहीच करत नाहीत! बॉक्स ऑफिस क्लॅश होऊ नये म्हणून मी 3 महिने आधीच चित्रपटाची घोषणा केली होती. तरीही असं होणं हे अजिबात योग्य नाही. कृपया, तुमची रिलीज तारीख आधी किंवा पुढे शिफ्ट करा ही नम्र विनंती! याशिवाय पुष्कर पुढे म्हणाला की 'चित्रपटांची रिलीज डेट एकच ठेवल्यानं कोणालाही फायदा नाही.' 

पुष्कर जोगचा या आधीचा 'बापमाणूस' या चित्रपटा वेळी देखील असंच सिनेमे क्लॅश होऊन पुरेसा प्रेक्षकवर्ग चित्रपटाला मिळाला नाही. याचीच पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून तो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे निर्मात्यांना तारखेत बदल करण्यासाठी विनंती करतोय. 

गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत वेगवेगळे बदल दिसून येतायत त्यातलाच हा एक महत्त्वाचा बदल म्हणजे बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालला नाही कि तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकायचा. पण या सगळ्यात मराठी चित्रपटांना योग्य ते स्थान मिळत नाही. ओटीटीचा प्रेक्षकवर्ग मोठा असला तरी काही कमी प्रमाणातच लोकं मराठी चित्रपट पाहताना दिसून येतात.  

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही फ्रेश जोडी 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतंय तसेच मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आणि पुष्कर जोग ही जोडी सुद्धा 'मुसाफिरा' या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटायला येतेय. आता पुष्कर जोगची या विनंती स्वीकारून चित्रपटाच्या तारखेत काही बदल होतोय का याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.