Salim Khan Reaction On Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे ४.५१ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम घटनास्थळी दाखल झाल्या. याप्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असतानाच आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खानच्या वांद्र्यातील निवासस्थानी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. रविवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर सहा गोळ्या झाडल्या. यात अभिनेता सलमान खानला कोणतीही दुखापत झालेली नाही. तो सुखरुप आहे. पण आता घडलेल्या घटनेवर त्याचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सलीम खान यांनी नुकतंच ‘सीएनएन न्यूज 18’ शी संवाद साधला. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेवर भाष्य केले.
'आता माझ्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. हल्ला करणाऱ्यांना फक्त प्रसिद्धीझोतात यायचे आहे. पण काळजी करण्याचे कोणतीही आवश्यकता नाही', अशी प्रतिक्रिया सलमानचे वडील सलीम खान यांनी दिली. मात्र या घडलेल्या प्रकाराबद्दल सलमान खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीच्या बाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन घटनास्थळी आले. त्यांनी सलमान खानच्या घराबाहेर चार राऊंड फायर केले. यानंतर ते दोघेही फरार झाले. सध्या पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट टाकून याचा उल्लेख केला आहे.
“सलमान खान, तुला आमची ताकद दाखविण्यासाठी हा हल्ला केला आहे. तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन करून त्याची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर आरोपींना सोडणार नसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.