यंदा वारीच्या आधीच विठ्ठल पावणार, 'विठ्ठला तूच' या चित्रपटाच्या, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

खरा विठ्ठल तोच असतो जो संकटावेळी मदतीस धावून येत आपली मदत करतो. आपलं रक्षण करतो, मात्र चित्रपटातील या अशाच विठ्ठलाची कथा म्हणजेच विठ्ठल शिंदेची कथा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. 

Updated: Apr 29, 2024, 02:47 PM IST
यंदा वारीच्या आधीच विठ्ठल पावणार, 'विठ्ठला तूच' या चित्रपटाच्या, ट्रेलरने वाढविली उत्सुकता  title=

मुंबई : 'माझा विठ्ठल कधी कुणाला कळलाच नाही' या संवादाने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 'विठ्ठला तूच' या चित्रपटाच्या ट्रेलरने आणि ट्रेलर मधील संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अल्पावधीतच अधिराज्य केलं आहे. 'वारीच्या आधीच माझा विठ्ठल मला भेटला' असं म्हणत 'विठ्ठला तूच' हा चित्रपट लवकरच म्हणजे येत्या ३ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

खरा विठ्ठल तोच असतो जो संकटावेळी मदतीस धावून येत आपली मदत करतो. आपलं रक्षण करतो, मात्र चित्रपटातील या अशाच विठ्ठलाची कथा म्हणजेच विठ्ठल शिंदेची कथा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. २ मिनिट ३९ सेकंदच्या या ट्रेलरमधील संवादांनी साऱ्यांच्या मनावर राज्य केले. एका गावात विठ्ठल शिंदे या नावाची महती कितपत आहे,  आणि हा विठ्ठल शिंदे काय करू शकतो, तो खरा विठ्ठल नेमका कसा झाला, या विठ्ठलाकडे सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर कशी आहेत, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. 

मात्र या विठ्ठलाने त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना बाजूला सारत समाजसेवा करत नेहमीच गोरगरिबांच्या विचारांना आधी प्राधान्य दिले. प्रेमात पडलेल्या या तरुणाचा जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा तो कसा सावरतो याची देखील झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. खरा विठ्ठल शिंदे हा कोण आहे?, हे लवकरच तुम्हाला म्हणजे येत्या ३ मे पासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'वाय जे प्रॉडक्शन' निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' हा चित्रपट असून या चित्रपटात नवोदित अभिनेता योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बीबे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. प्रफुल्ल म्हस्के यांनी दिग्दर्शनासह कथा व स्क्रीनप्ले अशी तिहेरी धुरा सांभाळली आहे. तर हर्षित अभिराज यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. भक्तीमय आणि ऍक्शनची जोड असलेल्या या चित्रपटात आशयघन अशा कथेने हा चित्रपट एका वेगळ्या ढंगात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी माणसा माणसांमध्ये दडलेल्या विठ्ठलाचे दर्शन कशाप्रकारे घडू शकत, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. येत्या ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.