जुन्या मालिकांवर रील्सचा नवा ट्रेंड, 10 वर्षानंतरही मालिकेशी प्रेक्षकांची अतूट 'रेशीमगाठ'

10 वर्षानंतरही मालिकेच्या शीर्षक गीताशी प्रेक्षकांशी असलेली रेशीमगाठ आजही अतूट आहे.आजही या मालिकेच्या शीर्षकगीतावरचे रील्स व्हायरल होतात.    

Updated: Apr 20, 2024, 12:37 PM IST
जुन्या मालिकांवर रील्सचा नवा ट्रेंड, 10 वर्षानंतरही मालिकेशी प्रेक्षकांची अतूट 'रेशीमगाठ'  title=

तृप्ती गायकवाड, झी मीडिया, मुंबई Zee Marathi Serial Title Song: सिनेमा आणि मालिकेतील कलाकार सतत कॅमेऱ्यासमोर येत असल्याने त्यांचे चेहरे आणि त्यांनी केलेलं काम हे प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतं.एखादा अमुक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हटलं तर त्याचा सिनेमा किंवा मालिका चटकन ओळखता येते. गीतकार आणि संगीतकारांच्या बाबतीत तितकंसं होताना दिसत नाही,हे पडद्यामागील कलाकार त्यांच्या शब्दातून आणि संगीतातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. 

मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे अश्विनी शेंडे आणि निलेश मोहरीर.अशोक पत्कींच्या मालिकांच्या शीर्षक गीतांना आजचा प्रेक्षक जितका भरभरून प्रतिसाद देतो तेवढंच प्रेम निलेश मोहरीरच्या गाण्यांनाही प्रेक्षक भरभरून देत असतात. कळत नकळत,  एकाच ह्या जन्मी जणू,  ते जुळून येती रेशीमगाठी या मालिकांच्यां शिर्षक गीतांचे  शब्द अश्विनीने लिहिले तर संगीत निलेशने दिलं. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेेतील 'तुझ्याविना' या गाण्याने तर मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांव्यतिरीक्त वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला. मालिकांचं कथानक जितकं भावतं तितकंच मालिकेचं शीर्षक गीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतं. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील आदित्य,मेघना आणि संपूर्ण देसाई कुटुंबावर प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं तेवढंच प्रेम आजही अश्विनीच्या शब्दांवर आणि निलेशच्या संगीतावर केलं जातं. 

कुठलंही काम हे कोण्या एका व्यक्तीमुळे कधीच यशस्वी होत नाही, तुमचं तुमच्या सहकलाकाराशी असलेलं बॉंडिंग तितकंच महत्वाचं ठरतं. निलेश आणि अश्विनीच्या प्रत्येक गाण्यातून त्यांची मैत्री आणि सहकलाकार म्हणून एकमेकांवर असलेला विश्वास कायम दिसून येतो.  लग्नानंतर हळुवार उलगडत जाणाऱ्या प्रेमकथेला साजेसे शब्द आणि त्या शब्दांना आलेला ठेहराव हृदयाचा ठाव घेतात. स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी हे गाणं गायलं. निहिराने याआधीही बऱ्याच सिनेमात गाणी गायली मात्र तिच्या आवाजाला लोकप्रियता मिळाली ते 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेच्या शीर्षक गीतामुळे. मेलोडी म्युझिक हे निलेशच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 

बऱ्याचदा म्हटंल जातं की, मराठी प्रेक्षक राहिला नाही, मराठी गाणी लोक ऐकत नाही. मात्र या सगळ्याला अश्विनी आणि निलेश या जोडीने खोडून काढलं.  हिंदी गाण्यांचा  ट्रेंड असतानाही लग्नसंमारंभात  'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचं शीर्षक गीत आवर्जून ऐकू येतं. रील्सच्या या नव्या जगात आजही हे गाणं नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. झी मराठीच्या मालिकांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मालिकांचं शीर्षक गीत. मालिकेतील पात्रांची गोष्ट कालांतराने फार लक्षात राहत नाही , मात्र मालिकेचं शीर्षकगीत बऱ्याच वर्षाचा काळ लोटला तरी प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळतात. तेव्हा त्या गाण्यांमुळे गीतकार, संगीतकार, गायक आणि प्रेक्षक यांच्यातील  'रेशीमगाठ' अतूट होत जाते.