महिलांनो सावध व्हा! रडत एखादं मुलं रस्त्यात मदत मागत असेल तर 'हा' ट्रॅप असू शकतो

National Crime Investigation Bureau Cautions Women: लहान मुलांच्या माध्यमातून मदतीचा बहाणा करुन महिला आणि तरुणींचं अपहरण करण्याचे किंवा गुन्हा घडवून आणण्याचे प्रकार वाढल्याचं चित्र दिसत असल्याचंही यात म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 19, 2023, 01:07 PM IST
महिलांनो सावध व्हा! रडत एखादं मुलं रस्त्यात मदत मागत असेल तर 'हा' ट्रॅप असू शकतो title=
महिलांविरोधातील गुन्हेगारीमध्ये वाढ

National Crime Investigation Bureau Cautions Women: तुम्हाला रस्त्यावर एखादं लहान मुलं रडताना दिसलं. तुम्ही त्याच्या जवळ गेलात आणि त्याने हातामधील एका कागदाच्या तुकड्यावर लिहिलेला पत्ता दाखवून घरचा पत्ता असल्याचं सांगत इथे मला सोडा असं सांगितल्यास अशा मुलांना थेट पोलिस स्टेशनला घेऊन जा किंवा 100 अथवा 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत घ्या, असं आवाहन राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेनं केलं आहे. बिगर सरकारी सेवाभावी संस्था असलेल्या एनसीआयबीने महिलांविरोधातील (Crime Against Women) ट्रॅप म्हणून अशा छोट्या मुलांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील ट्वीट एनसीआयबीच्या हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे. 

नेमका काय इशारा दिला आहे?

अशाप्रकार लहान मुलांच्या माध्यमातून अपहरण किंवा बालत्काराच्या उद्देशाने गुन्हेगारांच्या टोळ्या महिलांना आणि तरुणींना लक्ष्य करु शकतात असा इशारा एनसीआयबीने दिला आहे. अशाप्रकारे शाळा, कॉलेज, कार्यालयामध्ये किंवा स्थानिक बाजारपेठेत एकट्याने जाणाऱ्या महिलांना ट्रॅपमध्ये अडवण्याची शक्यता अधिक असते असंही एनसीआयबीने म्हटलं आहे. एकट्याने जाणाऱ्या महिलांना आणि तरुणींना अशा मदत मागणाऱ्या मुलांच्या बहाण्याने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न गुन्हेगार करु शकतात असं एनसीआयबीने म्हटलं आहे. या मुलांच्या हातातील पत्त्यावर गेल्यास तिथे त्यांचं घर नसून या महिलांबरोबर चुकीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या इशाऱ्यामधून एनसीआयबीला सूचित करायचं आहे.

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजेच एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षांमध्ये महिलांविरोधातील 1 कोटी गुन्ह्यांची नोंद झाली आहे असं केंद्र सरकारने लोकसभेमधील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं. एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 15.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी एकूण 4.3 लाख गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये महिलांचा पती आणि जवळचे नातेवाईकच तिच्यावर अत्याचार करतात किंवा गुन्हेगारी स्वरुपाची वागणूक देतात असं दिसून आलं आहे. 2021 मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी अपहरण आणि पळवून नेण्याच्या गुन्ह्यांची संख्या 17.6 टक्के इतकी आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यांच्या संख्या 7.4 टक्के इतकी आहे. 

एनसीआयबी स्वत:ची ओळख 'गुन्हे आणि भ्रष्टाचार संपवणारी टीम' अशी करुन देतं. समाज गुन्हेमुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काम करतो असं वेबसाईटवर म्हटलं आहे.