'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजले

Loksabha 2024 : दिल्लीतल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड घडलीय.. त्याचा परिणाम दिल्ली तसंच पंजाबचाही निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.

रामराजे शिंदे | Updated: May 10, 2024, 07:54 PM IST
'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजले title=

Loksabha 2024 :  ऐन लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन (Bail) मिळालाय. लोकसभा निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्याने आम आदमी पार्टीला (AAP) मोठा दिलासा मिळालाय. दिल्लीमध्ये 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहेत. तर पंजाबमध्ये 13 जागांसाठी 1 जूनला मतदान होणार आहे. आणि हे मतदान होईपर्यंत केजरीवाल बाहेर असणार आहेत. देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. त्यादरम्यान केजरीवाल तुरुंगातच होते.

तिहार तुरुंगातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशाता आता हुकुमशाहीचे दिवस संपणार आहेत, असं केजरीवाल यांनी म्हटलं.

50 दिवसांनी केजरीवाल तुरुंगाबाहेर
21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. तर 10 मे रोजी केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर झालाय. अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय. 2 जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार आहे. मात्र आता दिल्लीच्या निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्याने आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठीसुद्धा जमेची बाजू ठरलीय. अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे. त्यामुळे बाहेर आल्यानंतर केजरीवालांच्या सभांचा धडाका पाहायला मिळेल.

सुप्रीम कोर्टाच्या केजरीवालांना अटी
काही अटींवर सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर केला आहे. यात केजरीवाल निवडणूक प्रचार करु शकतात, पण मद्य धोरण प्रकरणावर बोलू शकणार नाहीत, दिल्लीच्या बाहेर जायचं असल्यास तपास यंत्रणांना सांगावं लागेल, दोन जूनला आत्मसमर्पण करावं लागेल अशा अटी त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्यात.

इंडिया आघाडीकडून स्वागत
केजरीवाल बाहेर आल्यानंतर इंडिया आघाडीनेही या निर्णयाचं स्वागत केलंय. देशात हुकूमशाही राजवटीविरुद्ध न्याय आणि दिलासा मिळणे हे देशात बदलत असलेल्या राजकीय वाऱ्याचे मोठे लक्षण आहे. अरविंद केजरीवाल खरं बोलतात आणि तेच भाजपला आवडत नाही. केजरीवाल आणि इंडिया आघाडीला अधिक शक्ती मिळाली आहे. आम्ही आमच्या संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण करू! अशी पोस्ट आदित्य ठाकरेंनी केलीय..

अरविंद केजरीवाल 1 जूनपर्यंत फक्त दिल्ली आणि पंजाबमध्येच नाहीत. तर देशभरातही इंडिया आघाडीसाठी प्रचार करतील असा विश्वास 'आप'ला वाटतोय. तेव्हा केजरीवाल बाहेर आल्याने 'आप'ला दिलासा तर भाजपला धक्का अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.