सॅलरी खात्यात जमा होताच संपते? आजमावून पाहा 50-30-20 चा फॉर्म्यूला; खर्च संपतील पण पैसा नाही

नोकरी करणाऱा प्रत्येक कर्मचारी महिन्याच्या शेवटी खात्यात पगार कधी जमा होणार याची वाट पाहत असतो. पण पगार खात्यात जमा होताच दुसऱ्या दिवशी हफ्ते, बिलं यात कधी संपून जातो हेच कळत नाही. त्यामुळे यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचं ठरतं.   

शिवराज यादव | Updated: May 13, 2024, 07:01 PM IST
सॅलरी खात्यात जमा होताच संपते? आजमावून पाहा 50-30-20 चा फॉर्म्यूला; खर्च संपतील पण पैसा नाही title=

नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी महिन्याच्या शेवटी खात्यात पगार कधी जमा होणार याची वाट पाहत असतो. पण पगार खात्यात जमा होताच हफ्ते, बिलं यात कधी संपून जातो हेच कळत नाही. यामुळे कितीही पगार असला तरी प्रत्येक कर्मचारी चिंतेत असतो. गुंतवणूक करण्याची इच्छा असतानाही खात्यात पैसे उरत नसल्याने अनेकांना ते शक्य होत नाही. अशा स्थितीत आर्थिक नियोजन फार महत्त्वाचं असतं. महिन्याच्या पगारासाठी एक विशेष बजेट तयार करुन त्यानुसारच खर्च करण्याची गरज आहे. आपलं महिन्याचं बजेट आखण्यासाठी तुम्ही 50-30-20 चा फॉर्म्यूला वापरु शकता. यामुळे तुमचं आर्थिक नियोजन आणखी सुधारेल. 

50-30-20 हा नियम एलिझाबेथ वॉरन यांनी सुरू केला होता, ज्यांचा यूएस सिनेट आणि टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली लोकांमध्ये समावेश होता. 2006 मधील त्यांच्या All Your Worth: The Ultimate Lifetime Money Plan या पुस्तकात त्यांनी त्यांच्या मुलीसह याबद्दल लिहिले. यामध्ये त्यांनी गरज, इच्छा आणि बचत अशी तीन भागात पगाराची विभागणी केली होती. एलिझाबेथ वॉरेनच्या मते, आपण आपल्या उत्पन्नातील 50 टक्के अशा गोष्टींवर खर्च केला पाहिजे ज्या आपल्यासाठी आवश्यक आहेत आणि ज्याशिवाय आपण जगू शकत नाही. याअंतर्गत घरातील रेशन, भाडे, बिलं, मुलांचं शिक्षण, ईएमआय आणि आरोग्य विमा यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. 

या नियमाचा दुसरा भाग 30 टक्के आहे, जो आपण इच्छांवर खर्च केला पाहिजे. हे असे खर्च आहेत जे टाळले जाऊ शकतात, परंतु त्यावर पैसे खर्च केल्याने लोकांना आनंद होतो. यामध्ये चित्रपट पाहणे, पार्लरमध्ये जाणे, खरेदी करणे, बाहेर खाणे किंवा एखाद्याचे छंद पूर्ण करणे यांचा समावेश होतो.

त्याचा तिसरा आणि शेवटचा भाग 20 टक्के आहे, जो या नियमानुसार बचतीसाठी ठेवावा. हे पैसे तुमच्या निवृत्तीचे नियोजन, मुलांचं उच्च शिक्षण, मुलांचं लग्न आणि आपत्कालीन निधीसाठी वापरावेत.

समजा तुमचा मासिक पगार 50 हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत 50-30-20 च्या नियमानुसार, तुम्ही 50 टक्के म्हणजेच 25 हजार रुपये घरगुती गरजांवर खर्च केले पाहिजेत. यामध्ये तुमचे घरभाडे, रेशन, वीज-पाणी बिल, मुलांची फी, कारचे पेट्रोल इत्यादी आवश्यक खर्चांचा समावेश असेल. त्यातील 30 टक्के म्हणजे 15 हजार रुपये तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकता. या इच्छांमध्ये प्रवास करणं, चित्रपट पाहणं, कपडे खरेदी करणं, मोबाईल-टीव्ही किंवा इतर गॅझेट खरेदी करणे यांचा समावेश असेल. 

हे सर्व केल्यानंतर तुमच्याकडे 20 टक्के म्हणजे 10 हजार रुपये शिल्लक राहतील. हे पैसे तुम्ही बचतीत टाकावेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे पैसे वेगळ्या पद्धतीने गुंतवू शकता. तुम्ही FD करू शकता, निवृत्तीसाठी एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकता. तसंच PPF मध्ये दीर्घ मुदतीसाठी पैसे ठेवू शकता किंवा म्युच्युअल फंडासारख्या साधनांमध्ये एसआयपीदेखील करू शकता. तुम्ही अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गुंतवणूक करु शकता.