Video: काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्...

MLA Tried To Drive Bus Accident Averted: महिलांसाठीच्या मोफत बस योजनेचं उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसच्या या महिला खासदार आल्या होत्या. यावेळी त्यांनी उत्साहाच्याभरात महिलांनी भरलेली बस चालवून उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला अन् घोळ झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2023, 10:20 AM IST
Video: काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्... title=
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Congress MLA Tried To Drive Bus Accident Averted: कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेसने (Congress) आता निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासन पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीदरम्यान काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला दिलेल्या दिलेल्या आश्वासनांमध्ये महिलांसाठी बरीच आश्वासने होती. हीच आश्वासने पूर्ण करताना 11 जूनपासून राज्यातील महिलांना मोफत बस सेवा देण्यासाठी 'शक्ति योजना' सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या शुभारंभाच्या वेळेस काँग्रेसच्या कोलार गोल्ड फिल्ड्स म्हणजेच केजीएफच्या काँग्रेस आमदार रुपकला (Karnataka MLA Rupkala) यांनी स्वत: बस चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्साहाच्याभरात बसचं स्टेअरिंग हाती घेतलेल्या रुपकला यांनी चुकून रिव्हर्स गेअर टाकला आणि गडबड झाली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

नेमकं घडलं काय?

'शक्ति योजने'चा शुभारंभ करण्यासाठी एका बस डेपोमध्ये आमदार रुपकला पोहचल्या होत्या. त्यांनी उद्घाटन करण्यासाठी स्वत: महिलांनी भरलेली बस चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्या चालकाच्या सीटवर बसल्या. पहिला गेअर टाकून बस थोडी पुढे घेण्याचा रुपकला यांचा प्रयतन होता. मात्र त्यांनी चुकून रिव्हर्स गेअर टाकला आणि सर्वांनाच घाम फुटला. इतरांनी हस्तक्षेप करुन गाडी थांबवेपर्यंत मागे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना आणि कारला या बसने धडक दिली होती. सुदैवाने रुपकला यांच्या बाजूला उभ्या असलेल्या बस चालकाने गाडीवर ताबा मिळवला आणि पुढील अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत काय दिसतंय?

ही बस कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्परेशनची (केएसआरटीसी) होती. व्हायरल व्हिडीओमध्ये काँग्रेसच्या महिला आमदार बस चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. बसचा चालक त्यांना गेअर समजून सांगत असतानाच त्यांनी पहिल्या गेअरऐवजी रिव्हर्स गेअर टाकला. यामुळे गाडी जवळजवळ 100 मिटर मागे गेली. या बसने मागे उभ्या असलेल्या पार्किंगमधील गाड्यांना धडक दिली. बस उलटी चालत असल्याचं पाहून काँग्रेसच्या महिला आमदार जरा घाबरल्या आणि काय करावं हे त्यांना कळायच्या आता बाजूला उभ्या असलेल्या बस चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

सोशल मीडियावरुन टीकेची झोड

अनेकांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या महिला आमदारावर टीकेची झोड उठवली आहे. बस चालवायचं ठाऊक नसताना एवढ्या लोकांचा जीव आमदाराने धोक्यात कसा टाकला असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी या आमदार बाईंना बस चालवण्याचं ज्ञान नसताना त्यांच्या हाती बसचं स्ट्रेअरिंग दिलच कसं असा प्रश्न विचारत केएसआरटीसीवर टीका केली आहे.