Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यू

Bus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 18, 2024, 10:47 AM IST
Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यू title=

हरियाणातील नूह येथे शुक्रवारी रात्री धार्मिक यात्रेवरुन आलेल्या पर्यटकांच्या बसला भीषण आग लागली आहे. या अपघातात आगीत होरपळून 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 24 जण जखमी झाले आहे. रात्री दीडच्या सुमारास अपघात झाला असून या बसमध्ये 64 लोकांचा समावेश होता. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. 

नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. 17-18 मे च्या मध्यरात्री 1.30 च्या सुमारास बसला अचानक आग लागली. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार, बसमध्ये प्रवास करणारे सर्व लोक पंजाबच्या लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगडचे रहिवासी होते. मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन ते परतत होते. बसमधील सरोज पुंज आणि पूनम यांनी आपण पर्यटक असल्याची माहिती दिली.

पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारानिया यांनी नऊ जणांचा मृत्यू आणि सुमारे 24 जण जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. तवाडूचे एसडीएम संजीव कुमारही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नुहचे आमदार आफताब अहमद म्हणाले की, ही अत्यंत वेदनादायक, दुःखद आणि हृदयद्रावक घटना आहे. ते म्हणाले की, वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

मदतीसाठी घटनास्थळी पोहोचलेल्या गावकऱ्यांपैकी साबीर, नसीम, ​​साजिद आणि एहसान यांनी सांगितले की, रात्री उशिरा त्यांना चालत्या बसमध्ये आग लागल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड करून बस थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र बस थांबली नाही. त्यानंतर एका तरुणाने दुचाकीवरून बसचा पाठलाग करत चालकाला आगीची माहिती दिली. बस थांबली तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.

लडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या लक्झरी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस जवळ घडली. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान समय सुचकता राखत सर्व भाविक बसमधून बाहेर पडल्याने बचावलेत. कोलारस पालिकेच्या अग्निशामक दलाने नंतर ही आग विझवली. परंतू घटनेत बस पुर्णत: जळून खाक झाली.