फळविक्रेत्याचा मुलगा ते देशाचे 'आईस्क्रिम मॅन'; नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन

Raghunandan Srinivas Kamath: नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन झाले आहे. कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2024, 02:46 PM IST
 फळविक्रेत्याचा मुलगा ते देशाचे 'आईस्क्रिम मॅन'; नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन title=
Ice Cream Man and Natural Ice Cream founder Raghunandan Kamath passes away

Raghunandan Srinivas Kamath: देशात आईस्क्रीम मॅन म्हणून लोकप्रिय असलेले आणि नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रघुनंदन कामत यांच्या निधनाची माहिती कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. रघुनंदन कामत यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फळविक्रेत्याचा मुलगा ते 400 कोटींच्या कंपनीचे मालक इथपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. 

रघुनंदन कामत यांच्या निधनाची माहिती कंपनीने सोशल मीडिया हँडल एक्सवर एक पोस्ट करत दिली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन  कामत यांचे निधन झाले आहे. आमच्यासाठी आजचा दुर्भाग्यपूर्ण आणि दुखःद आहे. रघुनंदन कामत यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरू येथील एका गावात झाला होता. त्यांना 6 भाऊ-बहिण होते. मुंबईला येईन त्यांनी त्यांच्या भावाच्या हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केले. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग बनवला. 

सुरुवातीच्या दिवसांत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. रघुनंदन कामत यांचे वडील फळ विक्रेते होते. ते मँगलोर येथील एका छोट्याश्या गावात फळ विकण्याचे काम करायचे व वडिलांना मदत करायचे. शाळेत नापास झाल्यानंतर त्यांना अखेर अभ्यास सोडायला लागला. 14 वर्षांचे असतानाच त्यांनी मुंबई गाठली.

रघुनंदन कामत यांनी 14 फेब्रुवारी 1984 साली त्यांनी चार कर्मचारी आणि 10 आईस्क्रीम फ्लेवर्स घेऊन कंपनीची स्थापना केली. त्यांनी फक्त फळ, दूध आणि साखर याचा वापर करुन आइस्क्रीम बनवले. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी पाव-भाजी सारख्या पदार्थांसोबत साइड आयटम म्हणून आईस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नॅचरल्सच्या दुकानात फक्त 12 फ्लेवर्स उपलब्ध होते. उत्तम चव आणि फळांचा स्वाद यामुळं लवकरच नॅचरल्स आइस्क्रीम पार्लर खूप प्रसिद्ध झाले. नॅचरल्स आईस्क्रीम आज जवळपास 400 कोटींची कंपनी आहे. तर देशभरात 135 आउटलेट आहेत.