स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत

ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.   

सायली पाटील | Updated: May 14, 2024, 03:16 PM IST
स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/

ICMR Cooking Instructions : शारीरिक सुदृढतेसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योग्य आणि संतुलित आहार. कारण, तुमचं पोट उत्तम तर, शरीर आणि शरीर उत्तम तर तुमचं मानसिक आरोग्य. अशा या समीकरणाचा समतोल राखण्यासाठी म्हणून केंद्राच्या वतीनं अर्थात ICMR नं काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शनपर सूचनांनुसार जर स्वयंपाकाच्या सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल केले, तर त्याचा थेट फायदा तुमच्या आरोग्याला मिळणार आहे. 

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी भोजनामध्ये प्रत्यक्ष स्वयंपाक क्रिया आणि त्याआधीची पूर्वतयारी अतिशय महत्त्वाची असते. याशिवाय अन्नपदार्थ शिजवण्यासाठी योग्य साहित्यापासून योग्य भांड्यांचा वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं. 

काही सोपे नियम 

आयसीएमआरच्या सूचनांनुसार भाज्या धुणं किंवा त्या उकळत्या पाण्यातून काढणं, मसाले लावून त्या मुरवणं या गोष्टींवर अधिक भर द्यावा. इतकंच नव्हे, तर कडधान्यांच्या बाबतीत ते शिजवण्याआधी किमान 3 ते 6 तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवलं जातं. पण, अनेकदा असं केल्यास त्यातील फायटिक अॅसिड कमी होत. भाज्या उकळत्या पाण्यातून काढून तातडीनं थंड पाण्यातून काढल्या जातात. यामुळं त्यावरील खतांचा प्रभाव कमी होतो, पण त्याची पोषक तत्त्वं मात्र कमी होतात. 

आयसीएमआरच्या इतर मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे... 

  • प्रेशर कुकिंग- वाफेच्या दाबाखाली अन्नपदार्थ शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. या पद्धतीत अन्नातील विटामिन आणि मिनरल कमी होत नाहीत. 
  • तळणे- या पद्धतीनं अन्नातील स्निग्धतेचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळं हृदयविकारांचा धोका बळावतो. त्यामुळं शक्यतो ही सवय टाळा. 
  • उकडणे आणि वाफवणे- या पद्धतीमध्ये पदार्थातील पाणी शोषून ठेवणारे घटक स्थित राहून ते पदार्थ अधिक पोषक करतात. 
  • मायक्रोवेवचा वापर - किमान वेळात जेवण बनवणाऱ्या या पद्धतीमध्ये पोषक तत्त्वंही नष्ट होत नाहीत. 

हेसुद्धा वाचा : अर्टिगा, इनोवाला मागे टाकत संपूर्ण कुटुंबासाठी महिंद्राची 'ही' कार ठरलीये भारतीयांची पहिली पसंती 

जेवण बनवताना योग्य भांड्यांचा वापर

स्वयंपाकासाठी योग्य भांड्यांचा वापरही तितकाच महत्त्वाचा असतो. इथं लहानशी चूकही तुम्हाला संकटात लोटू शकते. त्यामुळं आयसीएमआरनं यासंदर्भातील सूचनाही केल्या आहेत. 

  • ग्रेनाईट अथवा दगडाची भांडी- ही भांडी नॉनस्टीकच्या तुलनेत अधिक सुरक्षित समजली जातात. फक्त त्यावर रसायनांचा थर नाही, याची मात्र काळजी घ्यावी. 
  • टेफ्लॉनचा थर असणारी नॉनस्टीक भांडी- या भांड्यांमध्ये जेवण करत असताना ती मोठ्या आचेवर न ठेवता त्यातून धूर निघणार नाही याची काळजी घ्या. 
  • धातू आणि स्टेनलेस स्टील- या प्रकारच्या भांड्यांमध्ये जेवण बनवणं अतिशय सुरक्षिकत असतं. 
  • मातीची भांडी - अन्नपदार्थांच्या चवीसोबतच त्यातील पोषक तत्त्वं वाढवण्यासाठीसुद्धा मातीची भांडी फायदेशीर ठरतात. पण, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं.