8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...

 Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.   

सतिश मोहिते | Updated: May 14, 2024, 12:17 PM IST
 8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...  title=
Income Tax Raid In Nanded seized 170 crore asset from sanjay bhandari finance

Income Tax Raid In Nanded: नांदेडमधील एका व्यापाऱ्यावर टाकलेल्या छाप्यात आयकर विभागाला मोठे घबाड सापडले आहे. आत्तापर्यंत आयकर विभागाने जवळपास 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

25 कार अन् 60 अधिकारी 

नांदेडमधील भंडारी फायनान्सवर 10 मे रोजी सकाळी आयकर विभागाने छापा टाकला होती. भंडारी फायनान्सचे तीन कार्यालय, एक गोल्ड लोनचे कार्यालय आणि भंडारी बंधूंच्या घरावर एकाचवेळी आयकर विभागाने छापा टाकला होता. या छाप्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सामील झाले होते. 25 ते 30 वाहनातून जवळपास 60 ते 70 अधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले होते. एव्हढ्या मोठ्या संख्येने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई सुरू केल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली होती.

170 कोटींची मालमत्ता जप्त

आयकर विभागाने शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे दोन कार्यालय, तसच कोठारी कॉम्प्लेक्स मधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था आणि पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. तीन दिवस आयकर विभागाने झाडाझडती घेतली. या छाप्यात आयकर विभागाला जवळपास 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता भंडारी कुटुंबाकडे सापडली होती. यात तब्बल 8 किलो सोने आणि 14 कोटी रुपयांची रोकड आहे. सोमवारी भंडारी कुटुंबाच्या बँकेतील लॉकर ची तपासणी करण्यात आली. त्यात सोन्याची बिस्किटे आणि इतर दागिने असे 8 किलो सोने सापडले. तर एकूण 14 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती आहे. 

रोकड मोजण्यासाठी 14 तास लागले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने जप्त केलेली 14 कोटी रुपयांची रोकड मोजण्यासाठी तब्बल 14 तास लागले होते. तसंच, आयकर विभागाला काही दस्तावेजदेखील हाती लागले आहेत. तेदेखील जप्त करण्यात आले आहे. सलग तीन दिवस ही कारवाई सुरू होती. आता या प्रकरणी सखोलपणे चौकशी सुरू आहे. एव्हढ्या मोठ्या संख्येने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई सुरू केल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.