भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा

म्हणे आम्ही....

Updated: Oct 20, 2019, 02:58 PM IST
भारतीय सैन्यदलाची कारवाई होऊनही पाकिस्तानचा भलताच कांगावा  title=

मुंबई : भारतीय सैन्यदलाकडून पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईमध्ये भारतीय सैन्यदलाकडून अनेक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मुख्य म्हणजे पाकिस्तानकडूनही या हल्ल्याची कबुली देण्यात आली आहे. पण, त्यातही त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. 

'भारताकडून जुरा, शाकोट आणि नौशेरी सेक्टरमध्ये स्थानिकांवर निशाणा साधत बेछूट गोळीबार करण्यात आला. ज्याचं पाकिस्तानकडून अतिशय प्रभावी उत्तर देण्यात आलं. यामध्ये ९ भारतीय जवान मारले गेले तर, काही दखमी झाले. भारतीय सैन्याचे दोन बंकर उध्वस्त करण्यात आले. दोन्ही देशांकडून झालेल्या या गोळीबारात पाकिस्तानचा एक जवान आणि तीन नागरिकांना मरण आलं. तर, दोन जवान आणि पाच नागरिक या घटनेत जखमी झाले', अशी माहिती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली. 

दरम्यान, भारतीय सैन्यदलाने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱे दहशतवादी तळ उध्वस्त करत शेजारी राष्ट्राकडून सतत होणारे घुसखोरीचे प्रयत्न आणि दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिलं. 

रविवारी एका मोठ्या कारवाईत भारताकडून POKमध्ये असणाऱ्या नीलम घाटी परिसरातील दहशतवादी तळांवर निशाणा साधण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत पाकिस्तानचे ४-५ सैनिक मारले गेले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन पाहता याचं उत्तर म्हणून भारताकडून ही कारवाई करण्यात आली.