धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमी

Terrorist Attack In Poonch : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या (Air Force Convoy) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 5, 2024, 12:32 AM IST
धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमी title=
Terrorist Attack On Air Force Convoy Poonch

Terrorist Attack On Air Force Convoy : जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात शाहसीतारजवळ भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी वाहनांवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर आता स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसरात सध्या घेराव आणि शोधमोहीम सुरू आहे. ताफा सुरक्षित करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवानांनी प्रत्युत्तर देत गोळीबार करून सामना केला, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे. यामध्ये पाच IAF जवानांना गोळ्या लागल्या आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. तर एक जवान शहिद झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक सुरक्षा दलांकडून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हवाई तळाबाहेर शाहसीतारजवळील जनरल परिसरात हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी वाहनांवर गोळीबार केला. घटनेनंतर लगेचच स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. गेल्या महिन्यात पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात अनेक जवान शहीद झाले होते.

राहुल गांधी म्हणतात...

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये आमच्या लष्कराच्या ताफ्यावर झालेला भ्याड आणि धाडसी दहशतवादी हल्ला अत्यंत लज्जास्पद आणि दुःखद आहे. शहीद झालेल्या सैनिकाला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी आशा करतो, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.