कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; झोपेतच झटका बसल्याने घरातच गेला जीव

Akola Accident : अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील महान येथे कुलरचा शॉक लागल्याने पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 31, 2023, 11:30 AM IST
कुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; झोपेतच झटका बसल्याने घरातच गेला जीव title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील महान येथे पती-पत्नीचा कुलरचा शॉक (cooler) लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुलरमधील विजेच्या प्रवाहाच्या जोरदार झटक्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Akola Police) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पती पत्नीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महान गावातील प्रभाकर बापूराव जानोरकार व त्यांच्या पत्नी निर्मलाबाई प्रभाकर जानोरकार या दोघांचा मृत्यू झाला आहे. जानोरकार यांच्या घरातील कुलरमध्ये आलेल्या वीज प्रवाहामुळे दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. सध्या उन्हाळा संपल्याने या कुलरमध्ये पाण्याचा वापर न करता फक्त हवेसाठीच याचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे. रात्री झोपेत ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

अमरावतीमध्येही तरुणाचा शॉक लागून मृत्यू

अमरावतीमध्येही काही दिवसांपूर्वी कुलरचा शॉक लागून एका शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृत तरुणाचे नाव पंकज नामदेवराव कळमटे (वय २८ वर्ष, रा. राजुराबाजार) असे आहे. पंकज कळमटे हा पत्नी, दोन मुली आणि वडीलांसह राहत होता. पंकज कळमटे हा घरी कुलर सुरु करत असतानाच त्याला जोरदार शॉक लागला होता. त्यानंतर मित्राच्या सहाय्याने पंकजला गावातील डॉक्टरकडे नेले असता त्यांनी लवकर वरुड येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पंकजला वरुड येथील गोधने हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले‌. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.