विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : आठवड्याभरावर लग्न आलेल्या तरुणाची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून या युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. तर मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुढच्या आठवड्यात लग्न असल्याने वडीलांसोबत बॅकेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली. वडिलांसोबत जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या अंगावर चार वेळेस चार चाकी गाडी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या शेंदूरवादा- सावखेडा भागात घडली. एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार आहे. पवन शिवराम लोंढे असे मृत तरूणाचे नाव आहे. बहिणीच्या प्रेमविवाहामध्ये सहकार्य केल्याचा राग मनात धरून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून आरोपींनी बोलेरो जीपने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पवन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत.