मनसेचं 'इंजिन' यार्डात! 'कमळ', 'धनुष्यबाण' किंवा 'घड्याळा'वर लढा; महायुतीची राज ठाकरेंना ऑफर

Condition For Raj Thackeray MNS To Join Mahayuti: राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. ही भेट लोकसभा निवडणुकीमधील संभाव्य युतीसंदर्भातील चर्चेबद्दल होती असं सांगितलं जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 21, 2024, 08:26 AM IST
मनसेचं 'इंजिन' यार्डात! 'कमळ', 'धनुष्यबाण' किंवा 'घड्याळा'वर लढा; महायुतीची राज ठाकरेंना ऑफर title=
राज ठाकरेंना महायुतीने ऑफर दिल्याचा दावा

Condition For Raj Thackeray MNS To Join Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार की नाही यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत आज जागावाटपाचा तिढा सुटणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनसे चौथा जोडीदार म्हणून महायुतीत जाणार आणि गेला तर कोणत्या अटींवर यासंदर्भातील वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मनसेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेतल्यास शिंदे गट आणि पवार गट नाराज होऊन वाद होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मनसेला महायुतीमधील एका पक्षाच्या निवडणूक चिन्हावरच मनसेनं महायुतीमधील घटक पक्ष म्हणून लढावं असा प्रस्ताव राज ठाकरेंना देण्यात आल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे.

2 जागांची मनसेची मागणी

नवी दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी 2 जागा देण्याची मागणी अमित शाह आणि भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडे केल्याचं समजतं. मात्र भाजपा मनसेसाठी 2 जागा सोडण्यास तयार नसून एका जागेवर तुम्ही लढावं असं मनसेला सांगण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु होणार आहे. त्यापूर्वी महायुतीमधील उमेदवारांची घोषणा आगामी काही दिवसांत होऊ शकते. पण मनसेला कोणती जागा जाणार, तिथे कोण लढणार यासंदर्भातील शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांनी मनसेसंदर्भात एक दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकरांनी हा दावा केला आहे.

इंजिनवर लढायचं नाही अशी अट?

मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास त्यांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हाऐवजी महायुतीमधील एखाद्या पक्षाच्या चिन्हावर लढावं लागेल, असा प्रस्ताव राज यांना देण्यात आल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. म्हणजेच राज ठाकरेंच्या पक्षाचा एक किंवा 2 उमेदवार उभे राहिले तरी त्यांना भाजपाच्या कमळ, शिंदे गटाच्या धनुष्यबाण किंवा अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लढावं लागेल. 'महायुतीमधील पक्षांची चिन्हं जनतेला ठाऊक आहेत. या चिन्हांसाठी आम्ही राज्यभरामध्ये प्रचार केला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय अमित शाहांना घ्यावा लागणार आहे. त्यासंदर्भात काय ठरलं आहे याची आपल्याला कल्पना नाही. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मनसेसंदर्भातील निर्णय स्पष्ट होईल,' असं केसरकर म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना, "महायुतीमधील इतर पक्षांच्या जागांची संख्याही निश्चित व्हायची आहे. राज ठाकरे किती जागा मागणार, त्यांना किती जागा दिल्या जाणार या जागांची संख्या 48 मधून वजा करुन अन्य जागा घटकपक्षांच्या वाट्याला येणार आहेत. त्यानुसारच जागावाटप करावं लागेल," असंही केसरकरांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> 'घाबरलेले मोदी-शहा त्यांच्या...', राज-शाह भेटीनंतर ठाकरे गटाला वेगळीच शंका; म्हणाले, 'पुलवामा...'

अजित पवार गटाचा मान राखणार

केसरकरांनी शिंदे गटाचे एकूण 13 खासदार असले तरी अजित पवार गटाच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने 1 खासदार असतानाही जागावाटपात त्यांना योग्य मान-सन्मान दिला जाईल असं स्पष्ट केलं. महायुतीमधील 3 प्रमुख पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. लवकरच यासंदर्भातील संख्याबळ निश्चित होईल. यात भाजपा किती जागा घेणार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किती जागा घेणार हे निश्चित होणार असल्याचं आपल्याला समजलं आहे. मात्र या साऱ्या जागावाटपाच्या चर्चेत माझा प्रत्यक्ष सहभाग अगदीच अल्प होता, असं केसरकरांनी म्हटलं आहे.