ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव

Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..  

Updated: May 15, 2024, 04:20 PM IST
ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव  title=
संग्रहित फोटो

Maharashtra Farmer : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. पण याच दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या 61 दिवसांत तब्बल 66 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. तर जानेवारी ते एप्रिल या चार महिण्यात 188 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. जगाचा पोशिंदा बळीराजा आर्थिक मानसिक कोंडीत असताना शासन, प्रशासन आणि राजकारण्यांचं मात्र दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ नापिकी, सावकारांसह बँकांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलांची लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात मार्च महिन्यात तब्बल 40 शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. 

जिल्हाप्रशासन निवडणकीच्या तयारीत व पदाधिकारी राजकारणात व्यस्त असल्याने जगाचा पोशिंदा निवडणूक काळात (Loksabha Election) दुर्लक्षित राहिला आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात होत आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत असताना 2001 पासून 2024 पर्यंत तब्बल 5294 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय.

वादळी वाऱ्याचा फटका
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळ पावसाने (Unseasonal Rain) पु्न्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पाईट परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पॉलिहाऊसची तीन शेड उद्धवस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं. शेतात काबाड कष्ट करुन बँकेच्या कर्जावर उभारलेले पॉलिहाऊस डोळ्यासमोर उद्धवस्त झाल्याने शेतकरी हतबल झालाय. सरकारने तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसराला अवकाळी पावसाने झोडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. राजेंद्र घाडगे या शेतकऱ्याची तीन एकर केळीची बाग वादळी वाऱ्याच्या पावसाने जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय. डाळिंब, ऊस, कांदा यांसारख्या पिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे

धाराशिवमध्येही अवकाळी पावसाचा तडाखा
धाराशिव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे . वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय. तुळजापूर,उमरगा,लोहार्यासह, जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. अवकाळी पावसाने फळबागांचे नुकसान केलं आहे तर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागले आहेत

तर हिंगोली जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हिंगोलीच्या साटंबा इथं रामजी घ्यार यांच्या शेतातील गोठ्या समोरील झाडावर वीज पडली. त्यामुळे झाडाखाली बांधलेले दोन जनावरांचा भाजून मृत्यू झालाय, तर थोड्या अंतरावर असलेले तीन शेतकरी किरकोळ भाजले. वीज पडून मृत्यू झालेल्या जनावराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.