'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Kiran Mane Song : अभिनेते किरण माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका कार्यक्रमात एका गाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 2, 2024, 09:11 AM IST
'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा title=

Maharashtra Politics : शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका अद्यापही सुरु आहे. नेते मंडळींसोबत कार्यकर्तेही एकमेकांवर सोशल मीडियापासून प्रत्यक्षात टीका करताना दिसत आहेत. अशातच नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अभिनेते किरण मानेंनी देखील शिंदे गटावर गाण्यातून टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खरी शिवसेना कुणाची हे गाण्याच्या माध्यमातून सांगितलं आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

अभिनेते किरण माने यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी किरण माने यांनी शिवसेना सर्वसामांन्याची आहे. राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून त्यांचासोबत येण्याचा निर्णय घेतला, असे म्हटलं होतं. त्यानंतर किरण मानेंनी उघडपणे शिंदे गटावर टीका सुरु केली आहे. 

किरण माने सिंदखेडराजा येथे 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहिमेच्या उद्धाटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ही गाणं सादर केलं. या गाण्याचा व्हिडीओ किरण मानेंनी स्वतः शेअर केला आहे. "एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना... परवा सिंदखेडराजा इथे शिवसेनेच्या 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहीमेचा उद्घाटक म्हणून मी गेलो होतो. माझ्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची एक आठवण सांगताना माझा मित्र विनायक पवार याचं हे भन्नाट गाणं मी ऐकवलं", असे किरण मानेंनी म्हटलं आहे.  

किरण मानेंच्या गाण्याचे बोल काय आहेत?

एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना
आरं येडं पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना
आरं खुळ पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना
कसा खोटा जमाना आला रं
झालं इमान भाजीपाला रं
वाघ जाळ्यात अडकून गेला रं
आन् ऐटीत फिरतोय कोल्हा रं
आरं हरीश्चंद्राचं सोंग घेऊनी आला शकुनीमामा
शेंबडं पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना
आहे माझ्या देशाची शान रं, माझं पवित्र संविधान रं
दोन गुजरात्यांच्या हाती रं आज सारंच पडलंय गहान रं
अगर तुमच्या उरावर हुकूमशाही, माना अगर न मारा
उभा महाराष्ट्र सांगतोय रं, कुनाची हाय शिवसेना

दरम्यान, किरण मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केलं आहे. ओरिजिनल शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच असे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने किरण दादा.. तुम्ही कोरेगाव विधानसभा लढावी... नक्की यश मिळेल.. असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने तुझा पूर्ण सातारकरांना अभिमान वाटेल एक दिवस असे म्हटलं आहे.