Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार'

Maharastra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेलाय. पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे यांच्यात जुंपलीय. एकमेकांना गाडण्याचं आव्हान प्रतिआव्हान त्यांनी दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 4, 2024, 08:54 PM IST
Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार' title=
Uddhav Thackeray vs Narayan Rane

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यात राजकीय धूमशान चांगलंच पेटलंय. कोकणात (Kokan Politics) येऊन भाजप नेत्यांवर टीका करून दाखवा. परत जाऊ शकणार नाही, अशी धमकी राणेंनी ठाकरेंना दिली होती. या धमकीला न जुमानता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कणकवलीला राणेंच्या बालेकिल्ल्यात गेले. आडवा ये, तुला गाडूनच टाकतो, अशा ठाकरी शब्दांत त्यांनी राणेंचा समाचार घेतला. ठाकरेंच्या या इशा-यानंतर नारायण राणेही (Narayan rane) चवताळले. तो काय मला गाडणार? कुठं यायचं ते सांग, असा प्रतिआव्हान राणेंनी ठाकरेंना दिलं.

तुला बघून घेतो, तुझं अमुक करतो,  तू माझं काय वाकडं करणार आहेस. मी त्याला आजही सांगेन गेट आउट,  काय करायचं ते कर आणि मुळात तू कोणाला धमक्या देतोस? या धमक्यांना कोकणवासीयांनी केव्हाच गाडून टाकलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना पुन्हा निशाण्यावर घेतलं होतं. उद्धव ठाकरेंची काय औकात आहे, मी मनात नुसते आणले ना तरी बरेच काही करु शकतो, रुग्ण आहात तसेच रहावे, माझ्या रस्त्यात येऊ नये. पोलिस सरंक्षण घेऊन धमक्या देऊ नये असे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष अधिक प्रखरतने पहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 20 वर्षांपासून राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष सुरूय. 2005 मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर तोफ डागत राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. काही आमदारांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईकांनी 6 टर्म आमदार असलेल्या राणेंना पराभवाचं पाणी पाजलं. 2015 मध्ये वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राणे विरुद्ध तृप्ती सावंत अशी लढत झाली. त्यावेळीही ठाकरेंच्या शिवसेनेनं राणेंना हरवलं. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना होतोय.

वयाच्या 72 व्या वर्षी राणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत दोनवेळा त्यांना पराभूत केलंय. आता तिसऱ्यांदा पराभवाची नामुष्की राणेंवर येणार? की आतापर्यंतच्या पराभवाचं उट्टं राणे भरून काढणार? याकडं तळकोकणातल्याच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचे लक्ष लागलंय.