NCP Leader Rohit Patil Speech: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटलांची आज सभागृहाला प्रकर्षाने आठवण आली.कारण त्यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी आपल्या भाषणाने सभागृह दणाणून सोडलं.हुबेहुब आबांप्रमाणेच त्यांची शैली पाहून सर्वचजण भारावून गेले.
विधानसभा सभागृहाला आज माजी गृहमंत्री आणि स्वर्गीय नेते आर आर पाटील यांची आठवण झाली. तीच वर्कृत्वशैली तोच आवेश आज आमदार रोहित पाटलांच्या भाषणात पाहायला मिळाला. रोहित पाटील यांनी आज विधानसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. आणि अख्ख्या महाराष्ट्राला आर आर आबांची आठवण झाली. भाषणाची शैली, आवाज, बोलण्याची अनोखी हातोटी यामुळे सभागृहातील नेत्यांना आबाच बोलतायेत की काय असा भास झाला. रोहित पाटलांनी त्यांचं पहिलचं भाषण चांगलचं गाजवलं.
सांगलीच्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील हे देशातले सगळ्यात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आलेत....निवडून आल्यानंतर, शपथविधीनंतर रोहित पाटलांनी आज आपल्या वडलांप्रमाणच दमदार भाषण केलं.शाब्दिक कोट्या करत सरकारला टोला लगावत खुमासदार भाषण केलं.विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना रोहित पाटलांनी टोलेबाजी केली.
आबांच्या भाषण शैलीप्रमाणे सभागृहात अभंग, ओव्या सादर करत रोहित पाटलांनी वातावरण निर्मिती केली.अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक कोटी करत आपल्या वक्तृत्वाचं कसब दाखवून दिलं.
आपली वाणी आणि भाषण कौशल्याने आबांनी अवघा महाराष्ट्र आपलासा केला आता त्यांचाच कित्ता आबांचा पठ्ठ्या रोहित पाटील गिरवायेत.त्यांच्या या भाषणाने भविष्यात ज्युनिअर आर आर आबा म्हणून रोहित पाटलांची महाराष्ट्राला ओळख होईल यात शंका नाही.
रोहित पवार हे सर्वात कमी वयाचे आमदार आहेत. तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील यांनी विजय मिळवला. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील 28 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव केलाय.सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत रोहित पवार हे आघाडीवर दिसत होते.