विशाल सवने, झी मीडिया, पंढरपूर : Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.
वारीचं वार्तांकन करण्याचे माझं यंदाचं कितीवं वर्ष हे सांगणार नाही. त्याचं एक कारण आहे; मी वार्तांकन करताना एका आजीला विचारलं; "माऊली कितवी वारी"? माऊली म्हणाल्या, "भक्तीचा हिशोब ठेवायचा नसतो. मी वारीचं वार्तांकन काम म्हणून कधीच केलं नाही. पांडुरंगा प्रती असणारी माझी आवड.. भक्ती... प्रेमामुळे मी वार्तांकन केलं आणि पुढेही करत राहणार. म्हणून कितीवी वारी हे सांगणार नाही. अनेक जण म्हणतात की, पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला आणि थंड वारा वाहू लागला की पंढरीच्या वारीचे वेध लागतात. पण माझं तसं नाही; मला वर्षभर आषाढीचे वेध लागलेले असतात. आषाढीची वारी ही एक महाउपासना आहे. आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावातला एक तरी माणूस दरवर्षी पंढरपूरला येत असतो. पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक करी तीर्थव्रत. संत तुकाराम महाराज यांनी या अभंगात वारीचं महात्म्य वर्णिलं आहे. ज्याच्या घरात पंढरीची वारी आहे त्यांना तीर्थ यात्रा...व्रत वैकल्य करण्याची गरजच नाही. माझ्या घरात सुद्धा पंढरीची वारी आहे. माझे आजोबा माळकरी ते सुद्धा वारी करायचे. त्यामुळे माझ्यात सुद्धा या वारीचं वेड आहे.
वारीने मला एक गोष्ट शिकवली आहे. इंद्रायणीच्या तटावरून सुरु झालेला प्रवास चंद्रभागेच्या तटावर असणाऱ्या विठुरायाच्या समचरणावर माथा टेकवून स्थिरावतो. वारीचा प्रवास म्हणजे तुमचं जीवन आहे. पायी चालत असताना वाटेत कडाक्याचं ऊन, वारा, पाऊस आहे... पायाला कुठे ठेच लागते तर कुठं काटा मोडतो... हे सगळं तुमच्या आयुष्यात येणारी जणू दु:ख आहेत .... पण तुम्ही थांबत नाही चालत निघता कुठे? तर; पांडुरंगाच्या भेटीला. पांडुरंग हा ज्ञानाचा पुतळा आहे. कुठे तरी वाचलेलं 'वि' म्हणजे ज्ञान आणि 'ठोबा' म्हणजे आकार. विठोबा म्हणजे ज्ञानाचा आकार... हेच ज्ञान मिळवणं मनुष्याचे अंतिम ध्येय असतं. हेच आपल्याला वारी शिकवते. तुमची धाव नेहमी ज्ञान प्राप्तीकडे ठेवा.... सिद्धार्थाने सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी घराचा त्याग केला आणि गौतम बुद्ध झाले.
वारीच्या वाटेवर चालताना एक बाब मला वारंवार जाणवत होती ती अशी. यंदा पालखी मार्गाचं काम जोरात सुरु असल्याचं दिसलं. पालखी मार्ग रुंदावला आहे. वाहनं एका लेनने पुढे जात होती. वारकरी एका बाजूने पंढरीची वाट चालत होते. मात्र पालखी मार्गावर असणारी झाडांची गर्द सावली हरपली होती. झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली होती. दरवर्षी असणारी सावली यंदा वारीत दिसलीच नाही. यंदा पावसाचं उशीरा आगमन झालं. उन्हाचा कडाका प्रचंड होता. त्यामुळे झाडांची गरज असल्याचं मला वारंवार जाणवत होतं. आणि न राहून तुकोबारांचा तो अभंग गुणगुणत होतो.. वृक्षवल्ली आम्हा सोयरे!
सोळाव्या शतकात तुकोबारायांनी निसर्गाचं महत्त्व आपल्याला सांगितलं खरं पण ते अद्यापही आपल्याला कळलंच नाही...
अनेकांच्या घरात गणपती येतो. कुणाच्या घरी दीड तर कुणाच्या घरी 11 दिवस. गणेश विसर्जनाच्या दिवशी लहानमुलांची जशी अवस्था असते तशीच माझी आषाढी एकादशीला असते. माध्यम प्रतिनिधी म्हणून मला मंदिरात वार्तांकन करण्यासाठी जायला मिळतं. मी पटकन दर्शनही घेतो. दर्शन घेताना वॉक थ्रू सुद्धा करतो. पण हे करत असताना माझ्या डोळ्याच्या कडा नेहमी ओल्या होतात माहित नाही पण कंठ दाटलेला असतो. कारण 18 ते 20 दिवस आपण ज्याला भेटण्यासाठी निघालोय तो समोर कंबरेवर हात ठेवून विटेवर उभा असतो. त्याच्याकडे काय मागावं? हेच कळत नाही तरीही एकच मागणं मी मागत असतो. बा विठ्ठला यंदा बोलावलं पुढच्या वर्षी सुद्धा वारी घडू दे...