"मी धमक्यांची चिंता करत नाही, पण..."; जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar First Comment On Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2023, 04:25 PM IST
"मी धमक्यांची चिंता करत नाही, पण..."; जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया title=
मुंबईमध्ये बोलताना पवारांनी नोंदवली प्रतिक्रिया

Sharad Pawar First Comment On Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांच्या मुंबईला सिलव्हर ओक निवासस्थानाबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान शरद पवार यांनीच या प्रकरणावर स्वत: प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी यासंदर्भातील जबाबदारी राज्यामध्ये ज्यांच्या हातात सत्तेतची सुत्रं आहेत त्यांच्याकडे आहे असं म्हटलं आहे.

नेमकी कोणी आणि काय धमकी दिली?

'राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन' या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंट शरद पवारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. 'तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,' असं ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं असून याचसंदर्भातील चर्चा सुप्रिया सुळेंनी आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांबरोबर केली. सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीने शरद पवार यांच्या आजारावरुन टीका केल्याचंही यावेळेस सुप्रिया सुळेंनी आयुक्तांना सांगितलं. सौरभ पिंपळकर हा भाजप कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या ट्वीटर बायोमध्येही तसा उल्लेख आहे. "आयुष्यभर सुपारी कत्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाचं तोंड मरताना वाकडं होऊन मेल म्हणजे हे खरे आहे का? असे असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार," असं विधान या ट्विटमध्ये करण्यात आलं आहे. या कमेंट्सविरुद्ध तक्रार करण्यात आल्याचे समजते.

नक्की वाचा >> फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांना 'तुमचा लवकरच दाभोलकर होईल' अशी धमकी सोशल मीडियावरुन देण्यात आली होती. या धमकीसंदर्भात आज पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच शरद पवारांनी या धमकी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "यासंबंधी राज्याची कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधातील काळजी घ्यायची. या राज्यामध्ये लोकशाही पद्धतीने आवाज कोणाचं बंद करु शकेल असं वाटतं असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी धमक्यांची चिंता करत नाही. पण ज्यांच्या हातामध्ये राज्याची सुत्र आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा

गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया...

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. महाराष्ट्रात एक उच्च परंपरा आहे. कोणत्याही नेत्याला धमक्या देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणं हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिस निश्चितपणे कायद्यानुसार कारवाई करतील," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.