शिक्षिकेने चिमुरड्याला ओढणीने ठेवले बांधून; ठाण्यातील नर्सरीमधील धक्कादायक प्रकार

ठाण्यातील पाचपाखडी परिसरात सुप्रसिद्ध युरो किड्स नर्सरीत हा प्रकार घडला आहे. या नर्सरित आजूबाजूच्या परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चिमुकले शिकण्यासाठी येतात. या प्रकारामुळे पालक भयभित झाले आहेत. 

Updated: Jun 19, 2023, 11:41 PM IST
शिक्षिकेने चिमुरड्याला ओढणीने ठेवले बांधून; ठाण्यातील नर्सरीमधील धक्कादायक प्रकार title=

Thane Crime News : शिक्षिकेने एका तीन वर्षीय चिमुकल्याला ओढणीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील एका किड्स नर्सरीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना नर्सरी मधील सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. याबाबत युरो किड्स कडून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करून त्वरित निलंबन करण्यात आले आहे. तसेच पुन्हा अशी घटना घडणार नसल्याची हमी पालकांना देण्यात आली आहे.

ठाण्यातील पाचपाखडी परिसरात सुप्रसिद्ध युरो किड्स नर्सरीत हा प्रकार घडला आहे. या नर्सरित आजूबाजूच्या परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चिमुकले शिकण्यासाठी येतात. सर्व सुखसुविधांनी सज्ज अशी ही नर्सरी असल्यामुळे पालक निश्चिंत होऊन आपल्या पाल्ल्याला या नर्सरीत सोडतात. मात्र, सीसीटिव्हीच्या माध्यमातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोर आलेला हा व्हिडीओ ठाण्यातील नौपाडा परिसरातील पाचपाखाडी येथील सुप्रसिध्द युरो किड्सनर्सरी मध्ये घडलेला आहे. 

या व्हिडिओमध्ये एका शिक्षिकेने आपला क्लास भरवला आहे आणि या क्लास मध्ये अंदाजे दहा विद्यार्थी असल्याचे दिसून येत आहेत. विद्यार्थी आपल्या क्लास रूम मध्ये मज्जा मस्ती करत असताना त्या ठिकाणी ही शिक्षिका येते आणि ही शिक्षिका त्या विद्यार्थ्यांमधील एका तीन वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या ड्रेसच्या ओढणीच्या सहाय्याने गुंडाळून बांधून ठेवते. मात्र थोड्या वेळाने हा चिमुकला रडू लागल्याने आणि आरडाओरडा करू लागल्याने त्या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला सोडले. सदरचा व्हिडीओ हा 16 जून रोजी दुपारी 12.26 वाजण्याच्या सुमारास रेकॉर्ड झाला आहे.

या प्रकरणी युरो किड्स प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या इथे मुलांच्या सुरक्षितित अधित महत्वाची आहे. शिक्षकांची पार्श्वभूमी पाहतो आणि विश्वासू लोकांच्या सल्ल्यानंतर शिक्षकांची निवड केली जाते. त्यानंतर देखील अशी घटना घडली आहे ती खेदजनक गोष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित शिक्षिकेच्या विरोधात कारवाई करत शिक्षिकेला निलंबित केलं आहे. अशी घटना परत घडणार नसल्याची हमी युरो किड्स नर्सरी बिजनेस पार्टनर निवेदिता मुखर्जी यांनी चिमुकल्याच्या पालकाला दिली आहे. आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही शिक्षिकेला बोलावून त्या शिक्षिकेला निलंबित केलं असल्याची माहिती देखील युरो किड्स नर्सरी बिजनेस पार्टनर निवेदिता मुखर्जी यांनी दिली आहे.