पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 05:08 PM IST
पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप title=

पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक तरुण आणि तरुणी आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया अशी त्यांची ओळख पटली असून दोघं राजस्थानचे राहणारे होते. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी चालकाला चोप दिला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपी चालक अल्पवयीने असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. मिळालेल्या माहितीनुसार, चालक पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. कार वेगात होती असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.

अल्पवयीन चालक पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार चालवत असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. याच धडकेत अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया यांना जीव गमवावा लागला आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया दोघेही दुचाकीवरुन प्रवास करत होते. पीडितांचा मित्र एकीब रमझान मुल्ला याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि गाडी ताब्यात घेतली. आरोपी पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे. पोलीस याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत. 

येरवडा पोलिसांनी 279 (रॅश ड्रायव्हिंग), 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 337 (मानवी जीव धोक्यात घालणे) आणि 338 (गंभीर दुखापतीला कारणीभूत) आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे .