'...तर मंत्रालयात येऊन प्राण सोडू', पालिकेनेच जमीन हडपल्याचा शेतकऱ्याचा गंभीर आरोप

जर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्ही मंत्रालयात आत्महत्या करु, असा इशारा संबंधित शेतकऱ्याने दिला आहे

Updated: May 11, 2024, 01:38 PM IST
'...तर मंत्रालयात येऊन प्राण सोडू', पालिकेनेच जमीन हडपल्याचा शेतकऱ्याचा गंभीर आरोप title=

Vasai-Virar Municipal Corporation Farmer land encroachment : वसई विरार महानगरपालिकेने एका शेतकऱ्याच्या जागेत तलाव बांधून त्याच्या 20 गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता आमच्या जागेत तलाव बांधल्याचा आरोप जागा मालकाने केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी न्याय न दिल्यास मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा संबंधित शेतकऱ्याने दिला आहे. 

पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार

विरार पूर्ण नारंगी या ठिकाणी सर्वे क्रमांक 213 ही जागा कोशाव सायमन तुस्कानो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे आहे. पण असे असतानाही पालिकांनी सातबारा धारकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या जागेत तलाव बांधला आहे. यामुळे त्या संबंधित शेतकऱ्याच्या 20 गुंठे जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. याप्रकरणी त्या शेतकऱ्याने पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. 

आम्हाला आमची जागा हवी आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना आमची जागा हवी असल्यास आम्ही त्यांना ती द्यायला तयार आहोत. पण अशाप्रकारे अतिक्रमण करुन आम्ही आमची जागा पालिकेच्या घशात घालणार नाही. तसेच पालिका आजवर स्वतःच्या जागा वाचवू शकली नाही, त्यात आता शेतकऱ्यांच्या जागांवरही अतिक्रमण करु लागली आहे. त्यामुळे आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न जागा मालकाने उपस्थित केला आहे. 

मंत्रालयात आत्महत्या करु, शेतकऱ्याचा इशारा

तसेच पालिकेचे अधिकारी आमच्या तक्रारीकडे कानाडोळा करत आहे, असा आरोपही त्या शेतकऱ्याने केला आहे. जर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्ही मंत्रालयात आत्महत्या करु, असा इशारा संबंधित शेतकऱ्याने दिला आहे. यामुळे आता वसई विरार महानगरपालिका शेतकऱ्याची जागा परत देणार का? किंवा याप्रकरणी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.