मुंबई पालिकेचं मिशन पूर्ण, राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण 100 टक्के

राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण झाले आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Feb 3, 2024, 02:56 PM IST
मुंबई पालिकेचं मिशन पूर्ण, राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण 100 टक्के  title=
Mission of Mumbai Municipality complete survey of Maratha community and open categories through State Backward Classes Commission 100 percent

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल आहे. दिनांक 23 जानेवारी 2024 ला या सर्वेक्षणाला सुरुवात झाली ते 1 फेब्रुवारी 2024 या दिवसांमध्ये हे सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण झाल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आल. या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने साधारणपणे 30 हजार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी सदर कालावधीत मुंबईतील सर्व विभागात (वॉर्ड) घरोघरी जाऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण निर्धारीत कालावधीत पूर्ण केलंय. 

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 23 जानेवारी 2024  पासून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत मराठा तसंच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केल होतं. नुकतेच हे सर्वेक्षण पूर्ण झालं असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 38 लाख 79 हजार 46 इतक्या घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी 30 हजार कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत केली आहे. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठत 1 फेब्रुवारी 2024 ला बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मराठा/खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलं असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या ‘मास्टर ट्रेनर’ने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नोडल ऑफीसर, असिस्टंट नोडल ऑफीसर व मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणासाठीचे प्रशिक्षण दिले होते. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते.  सर्वेक्षणादरम्यान एकूण 160 ते 182 प्रश्न असून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरुन घेण्यात आली. सदर माहिती मुलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेण्यात आली नाही. ही कार्यवाही उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या दैनंदिन संनियंत्रणात करण्यात आली.