घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमी

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 14, 2024, 12:31 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमी  title=

Mumbai Ghatkopar Hoarding Accident Update: सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात घाटकोपरमध्ये एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोकं अडकल्याची माहिती होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आता 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीये. तर 43 जण जखमी झाले आहेत. अद्याप होर्डिंगखालून 74 जणांना बाहेर काढलं असल्याची माहिती आहे. अशातच आता होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

होर्डिंग ओनरवर गुन्हा दाखल

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत 74 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय. संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं होतं. या दुर्घटनेतील जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत हे आदेश दिले. या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही मुख्यत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. 

घाटकोपरमध्ये कोसळलेले होर्डिंग्ज अनधिकृत होते?

घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जातोय. यावेळी पालिकेने संबंधित होर्डिंग उभारणीवर आक्षेप घेतला होता. पालिका केवळ 40 फूट × 40 फूट होर्डिंग उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग  120 फूट × 120 फुटांचे असल्याची माहिती आहे.  इगो मिडिया कंपनीने होर्डिंग उभारले होते. रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग होते.