मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला?

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घर खरेदीसाठी अनेक पर्याय. आगामी प्रकल्पांविषयीची माहिती हवीये?   

सायली पाटील | Updated: Apr 5, 2024, 12:56 PM IST
मुंबई की नवी मुंबई? नव्या घरांसाठी सर्वसामान्यांची पसंती कोणाला? title=
Mumbai navi Mumbai housing real estate latest update

Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या सीमा मागील काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या विस्तारल्या आहेत. विविध महामार्ग आणि नव्या सागरी सेतूंमुळं शहराला उपनगरांशी जोडण्यात आल्यामुळं चांगल्या जीवनशैलीच्या आणि मनाजोग्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठीसुद्धा कैक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अशा या मुंबई शहरामध्ये हजारो गृहप्रकल्प बांधकामाधीन आहेत. 

मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या मुंबई महानगर प्रदेशात वर्षभरात (1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024) या काळात विकासकांनी तब्बल 1875 नवे गृहप्रकल्प हाती घेतले. त्यातच महारेराकडून मागील आर्थिक वर्षात राज्यातील 4332 गृहप्रकल्पांना मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये एमएमआरमधील प्रकल्पांचाही समावेश आहे. त्यामुळं येत्या काळात खिशाला परवडणाऱ्या दरात आणि अपेक्षित भागामध्ये तुम्ही घर घेण्यासाठी उत्सुक असाल तर येत्या काळात एकाहून एक पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध असतील. 

नवी मुंबईला पुन्हा नव्यानं आकार लाभतोय... 

सिडकोनं तयार केलेल्या Palnned City म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईमध्येही नवनवीन आणि विविध दरांमध्ये घरं उपलब्ध करून देणारे कैक गृहप्रकल्प आतापर्यंत आकारास आले. तर, काही प्रकल्पांची बांधणी अद्यापही सुरुच आहे. त्यामुळं येत्या काळात मुंबईतून अनेकांचेच पाय नवी मुंबईकडे वळताना दिसल्यास त्यात वावगं वाटण्याचं कारण नाही. 

नवी मुंबईकडे अनेकांचाच कल असण्यामागे काय कारणं? 

नवी मुंबईमध्ये अनेकांनीच हक्काचं घर खरेदी करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी रस दाखवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे येथील पायाभूत सुविधांचा झालेला विकास. घरांची आरामदायी रचना, गृहसंस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा, मोकळे रस्ते आणि इतर सोयीसुविधा पाहता नवी मुंबई अनेकांच्याच पसंतीत उतरत आहे. 

हेसुद्धा वाचा : मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे एका अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा; घोकंपट्टीला पर्याय सापडला

वाशी आणि बेलापूरसारख्या ठिकाणांवर अनेक बड्या कंपन्यांनी कार्यालयांसाठीही जागा पाहण्यास सुरुवात केली आहे. वाशीपासून सानपाडा, सीवूड्स, नेरुळ, बेलापूर, खारघर आणि अगदी पनवेलपर्यंत निर्धारित जागेत मॉल, रुग्णालयं आणि तत्सम सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळं नवी मुंबई येत्या काळात खऱ्या अर्थानं मुंबईला टक्कर देणार हे नाकारता येत नाही. 

अटल सेतू, नवा वाशी खाडी पूल, दृष्टीक्षेपात असणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ, रस्ते मार्गानं सहज पोहोचण्याची सोय असल्यामुळं वाशी महत्त्वाचं केंद्र, एपीएमसी या आणि अशा अनेक कारणांमुळं नवी मुंबईकडे गुंतवणूकदार, घर खरेदीदार सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजकांचा ओघ वाढताना दिसत आहे. तुमची पसंती कोणाला? मुंबई की नवी मुंबई?