घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, फरार आरोपी भावेश भिंडेला अखेर अटक

Ghatkopar Hoarding Collapsed : आताचाी मोठी बातमी समोर आलीय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिंडेला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय.

राजीव कासले | Updated: May 16, 2024, 08:46 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण,  फरार आरोपी भावेश भिंडेला अखेर अटक title=

Ghatkopar Hoarding Collapsed : आताचाी मोठी बातमी समोर आलीय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिंडेला (Bhavesh Bhinde) मुंबई क्राईम ब्रांचने  (Mumbai Crime Branch) अटक केली आहे, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Collapsed) आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय. तर  जवळपास 75 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधल्या उदयपूरमधून अटक केली आहे. त्याला आता मुंबईत आणण्यात येणार आहे. 

भावेश भिंडे मुख्य आरोपी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे घटनेनंतर फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची नऊ पथकं वेगवेगळ्या राज्यात पाठवण्या आली होती. भिंडे हा मेसर्स ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक आहे. दुर्घटनेनंतर भावेश भिंडेने आपला मोबाईल बंद केला. पण त्याआधी त्याचं शेवटचं मोबाईल लोकेशन लोणावळ्याला दाखवण्यात आलं होतं. 

कोण आहे भावेश भिंडे?
आरोपी भावेश भिंडेंने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याच्या इगो नावाच्या कंपनीच्या माध्यमातून मोठ मोठे होर्डिंग्ज लावले जातात.. याच भावेशवर विनापरवानगी साइन बोर्ड लावल्याचे 26 गुन्हे दाखल आहेत.. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातच तसा उल्लेख आहे. भावेश भिंडेवर एवढे गुन्हे असतानाही रेल्वे पोलिसांनी त्याला होर्डिंग्ज लावण्याची परवानगी कशी दिली.. त्याचं रेल्वे खात्यात कुणाशी साटंलोटं होतं का असा सवाल आता निर्माण होतोय... घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतलचं नाही तर आशियातलं सर्वात मोठं होर्डिंग असल्याची जाहीरातबाजी भावेश भिंडेंच्याच कंपनीने केली होती. 

मुंबईत महापालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40 फूट होर्डिंग लावण्याची परवानगी आहे. या होर्डिंगची उंची 120 बाय 120 फूट असल्याचं समोर आलंय. तेव्हा या होर्डिंगला परवानगी दिली नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय. मुंबईत जाहिरातीचे होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 होर्डिंग्स बॅनर लावण्याची परवानगी दिलेली आहे. यात 179 होर्डिंग्स रेल्वेच्या हद्दीत आहेत.. ज्याची मुंबई महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती,

भावेश भिंडेवर आधीच 26 गुन्हे दाखल होते. तरीही उजळ माथ्याने तो व्यवहार कसे करत होता.. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर होर्डिंगबाबत वारंवार आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं. ताबडतोब कारवाई का केली नाही असे अनेक सवाल या दुर्घटनेच्या निमित्ताने उपस्थित होतायत.