'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकप संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनला संदेश दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2024, 05:52 PM IST
'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...' title=

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान देण्यात आलं आहे. संजू सॅमसनला 10 वर्षांनी वर्ल्डकप संघात संधी मिळाली असून, अखेर प्रतिक्षा संपली आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीचं बक्षीस संजू सॅमसनला मिळालं आहे. तसंच डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. दुखापतीमधून सावरलेला ऋषभ पंत भारतीय संघाचा विकेटकिपर असणार आहे. पर्यायी विकेटकिपर म्हणून संजू सॅमसनला 15 सदस्यांच्या संघात जागा मिळाली आहे. 

टी-20 वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारे संजू सॅमसनचं भविष्य ठरणार आहे. जर ते फ्लॉप झाला तर कदाचित हा त्याच्या करिअरचा शेवट असेल. पण जर त्याने चांगली कामगिरी केली जग त्याची दखल घेत कौतुक करेल असं भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने म्हटलं आहे. संजू सॅमसनने 2012 मध्ये गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) केकेआर संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आता संजू सॅमसनची वेळ असून, त्याने संघासाठी सामने जिंकायला हवेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. संजू सॅमसनकडे पुरेसा अनुभव असून प्रत्येकाच्या लक्षात राहणारी खेळी करण्यासाठी त्याने तो पूर्ण पणाशी लावला पाहिजे असंही त्याने सांगितलं आहे. 

"आता तुला वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे, त्यामुळे तुझ्याकडे संधी आहे. संधी मिळाल्यानंतर आता भारतासाठी सामने जिंकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तुझ्याकडे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तू आता नवखा नाहीयेस, ज्याला फार वाट पाहायची आहे," असं गंभीरने SportsKeeda वर सांगितलं. 

"तुम्ही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आस्वाद घेतला आहे.तुम्ही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, आणि आता तुम्हाला विश्वचषक खेळण्याची संधी आहे. त्यामुळे, आशा आहे की, संजू या टप्प्यावर जगाला आपण किती सक्षम आहोत हे दाखवेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि त्यातही विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळताना संपूर्ण जग पाहतं आणि त्याची दखल घेतं," असं गंभीर म्हणाला आहे. 

आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करताना सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सॅमसनने 13 सामन्यांत पाच अर्धशतकांसह 504 धावा केल्या. तो सध्या ऑरेंज कॅपच्या यादीत विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, ट्रॅव्हिस हेड, रियान पराग आणि साई सुदर्शन यांच्या मागे सहाव्या स्थानावर आहे.

सॅमसन 2012 मध्ये केकेआर संघात आला तेव्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण गौतम गंभीरने आपण त्याच्यातील कौशल्य ओळखलं होतं असं सांगितलं. गंभीर म्हणाला की, "एखादा खेळाडू कसा आहे समजून घेण्यासाठी मला 5 मिनिटं पुरेशी असतात. तुम्ही मानसिक आणि कौशल्य अशा दोन्ही बाजूंनी मोठे होत असता. जर तुम्ही एकाच ठिकाणी अडकलात तर जास्त काळ टिकू शकणार नाही. फिटनेस, पॉवर हिटिंग, किपिंग किंवा कर्णधारपद...कोणत्याही ठिकाणी त्याने चुकीचं पाऊल टाकलेलं नाही. कर्णधारपद तुम्हाला अजून चांगला खेळाडू बनवतं. त्याचं कर्णधारपद संधी मिळाल्यास वर्ल्डकपमध्येही दिसेल अशी आशा आहे".