IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 28, 2023, 10:48 PM IST
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव title=
IND vs AUS 3rd T20I

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दिलेलं 223 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलिया अखेरच्या बॉलपर्यंत झुंजून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत लाज राखली असून टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे.

टीम इंडियाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ट्रॅव्हिस हेड आणि आरोन हार्डी यांनी आक्रमक सुरूवात केली. मात्र, अर्शदीपने हार्डीच्या रुपात पहिला दणका दिला. त्यानंतर आलेल्या जोश इंग्लिस याला बिश्नोईला घरचा रस्ता दाखवला. मात्र, त्यानंतर मॅक्सवेलने (Glenn Maxwell) नाकपुड्या फुगवल्या अन् हाणामारी सुरू केली. तर दुसऱ्या बाजूने स्टॉयनिस आणि टीम डेव्हिड लवकर बाद झाले. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 65 धावांची गरज होती. मॅक्सवेल जोपर्यंत मैदानात तोपर्यंत सामना कधीही फिरू शकत होता. मात्र, कॅप्टन वेडने सामना पलटी करण्याचा प्रयत्न केला. सामना 6 बॉल 21 वर आला अन् अखेरच्या ओव्हरमध्ये एक बॉलवर 2 धावांची गरज असताना मॅक्सवेलने शतक ठोकून सामना जिंकवला.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 24 धावांवर सलामीचे दोन फलंदाज माघारी परतले. यशस्वी जायस्वाल 6 धावा काढून बाद झाला तर ईशान किशन याला खातंही उघडता आलं नाही. 2 विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) ऋतुराजच्या साथीनेल भारताचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत 39 धावा कुटल्या. मात्र, सूर्या बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सुत्र हातात घेतली. ऋतुराज आणि तिलक वर्मा यांनी शतकी भागिदारी केली अन् ऋतुराज गायकवाडने 52 बॉलमध्ये टी-ट्वेंटी करियरमधील पहिलं शतक झळकावलं. ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची खेळी केली अन् टीम इंडियाला 222 धावांवर पोहोचवलं.

आणखी वाचा - IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?

टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (WK), सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, टिळक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.

टीम ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (C), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन.