टीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत... असा आहे बीसीसीआयचा प्लान

Team India Head Coach : टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यताआहे. यासाठी बीसीसीआयने प्रक्रियाही सुरु केली आहे. 

राजीव कासले | Updated: May 15, 2024, 06:10 PM IST
टीम इंडियाला मिळणार परदेशी कोच? गंभीर, सेहवागही शर्यतीत... असा आहे बीसीसीआयचा प्लान title=

Team India New Coach: भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup) मध्ये मैदानात उतरणार आहे. पण या स्पर्धेनंतर भारतीय संघात (Team India) बदल होणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याची सुट्टी होणार असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येतेय. परदेश प्रशिक्षकाची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने (BCCI) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू टॉम मुडी (Tom Moody) आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन प्लेमिंगसह (Stephen Fleming) काही खेळाडूंशी बोलणी सुरु केली आहे. 

टीम इंडियासाठी परदेशी प्रशिक्षक
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जस्टिन लँगरचं नावही प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहेत. याशिवाय काही भारतीय दिग्गज खेळाडूही प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. यात गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची नावं आघाडीवर आहे.  पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाला परदेशी प्रशिक्षक मिळण्याची जास्त शक्यता आहे. बीसीसीआयने टॉम मूडी आणि स्टीपन प्लेमिंग यांच्याशी संपर्क केला आहे. यापैकी फ्लेमिंगची मजबूत दावेदारी आहे.

अर्जासाठी 27 मे अंतिम तारीख
बीसीसीआयने 13 मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्या राहुल द्रविड टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सांभाळत आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडला आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पर्यंत प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. पण यानंतर बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कप 2024  पर्यंत राहुल द्रविडला मुदतवाढ दिली. 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाची शोधाशोध सुरु केली आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची 27 मे ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी कार्यकाळ वाढवायचा असल्यास राहुल द्रविडही या पदासाठी अर्ज करु शकतात, असं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. 

कधीपर्यंत असणार नव्या कोचचा कार्यकाळ
राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगी कोचची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक ठरल्यानंतर केली जाणार आहे. टीम इंडियाच्या नव्या कोचचा कार्यकाळ 3 वर्ष म्हणजे एकदिवसीय वर्ल्ड कप 2027 पर्यंत असणार आहे.