India Playing 11 vs Australia 1st T20I match: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलियाकडून (Australia) पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका (India vs Australia First T20) खेळवली जातेय. मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टनमध्ये (Visakhapatnam) रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी20 मालिकेसाठी भारतीय संघातील दिग्गजांना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे.
अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
भारतीय डावाची सुरुवात ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड करताना दिसतील. तर तिसऱ्या क्रमांकावर स्वत: कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)फलंदाजीला उतरेल. मधल्या फळीत तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंह धमाका करण्यासाठी उतरतील. फिरकीची जबाबदारी रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदरवर असेल. वेगवान गोलंदाजीची मदार अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णावर असेल. त्यांना मुकेश कुमारची साथ मिळेल.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी संघ
टीम इंडियात युवा खेळाडूंचा भरणा आहे. तर ऑस्ट्रेलिया संघात अनुभवी खेळाडू दिसणार आहेत. यात स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टॉईनिस आणि कर्णधार मॅथ्यू वेड यांचा समावेश आहे.
टी20 वर्ल्ड कपपूर्वी इतके सामने
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता काहीच महिने उरले आहेत. 4 जून 2024 या स्पर्धेची सुरुवात होईल. टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया एकूण 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. शिवाय आयपीएलचा सोळावा हंगामही होणार आहे. याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर आयपीएलचा हंगाम सुरु होईल. त्यामुळे भारतीय युवा खेळाडूंना टी20 वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवण्यासाठी पुरेशी संधी आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल/वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा/आवेश खान आणि मुकेश कुमार
ऑस्ट्रेलियाा संघ
स्टीव स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, एरॉन हार्डी, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर, कर्णधार), सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर सांघा.