24 तासात बदलणार भारताचा वर्ल्डकपचा संघ? Playing XI मधलं 1 नाव पाहून बसेल धक्का

India vs Australia Rajkot ODI: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली असली तरी अंतिम सामना हा पहिल्या 2 सामन्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 26, 2023, 10:59 AM IST
24 तासात बदलणार भारताचा वर्ल्डकपचा संघ? Playing XI मधलं 1 नाव पाहून बसेल धक्का title=
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली आहे

India vs Australia Rajkot ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीबरोबरच हार्दिक पंड्या, कुलदीप यादव हे खेळाडूही खेळणार आहे. वर्ल्डकपसाठी अंतिम 15 खेळाडूंची निवड करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील हा शेवटचा सामना महत्त्वाचा मानला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे म्हणजेच आयसीसीकडे भारताला वर्ल्डकपसाठीच्या आपल्या अंतिम संघाची यादी सुपूर्द करायची आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिकेतील अंतीम सामना म्हणजे संघात कोणाला स्थान द्यावं आणि कोणाला नाही याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी शेवटची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे शेवटचे 2 सामन्यांमधील कामगिरी पाहता भारताचा वर्ल्डकपचा संघ बदलला जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकोटमध्ये संघात अनेक बदल निश्चित

भारतीय संघ व्यवस्थापनाने वर्कलोड पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमधून रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवला विश्रांती दिली होती. मात्र हे सर्व खेळाडू मालिकेतील अंतिम सामना म्हणजेच राजकोटमधील सामना खेळणार असून भारत पूर्ण ताकदीने अंतिम सामना खेळणार आहे. म्हणजेच आधीच्या 2 सामन्यांमधील काही खेळाडू बेंचवर बसतील हे निश्चित आहे. अशाच समोर आलेल्या बातमीनुसार, स्फोटक फलंदाज शुभमन गिल आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुरला शेवटच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे राजकोटच्या सामन्यात कोण खेळणार आणि कोण बाहेर बसणार हे वर्ल्डकपच्या दृष्टीनेही महत्त्वाचं मानलं जात आहे.

या दोघांना मिळू शकतं स्थान

17 खेळाडूंचा भारतीय संघ वर्ल्डकपसाठी यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. मात्र यात बदल होण्याची दाट शक्यता आहे. अक्षर पटेल जायबंदी असून तो शेवटचा एकदिवसीय सामनाही खेळणार नाही. त्याच्या जागी वर्ल्डकपच्या संघात आर. अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळू शकतं. सुंदरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे आर. अश्विनने दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम गोलंदाजी केली. मोहालीमध्ये त्याला फारसं यश मिळालं नाही. पण इंदूरमध्ये त्याच्या ऑफ स्पिन गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नांगी टाकल्याचं दिसून आलं. अश्विनने इंदूरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. अश्विनने या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये दाखवलेलं वैविध्य कौतुकास पात्र ठरलं. विरोधी संघाला धडकी भरवणारी त्याची ही शैली भारताला फायद्याची ठरु शकते. मार्नस लैबुशेन आणि डेव्हिड वॉर्नरला बाद करताना अश्विनने रिव्हर्स कॅरम बॉल टाकला होता. 

अश्विन ठरु शकतो फायद्याचा कारण...

37 वर्षीय अश्विनने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं असून त्याची वर्ल्डकपच्या संघात वाईल्ड कार एन्ट्री होऊ शकते. भारताने काही आठवड्यांपूर्वी जाहीर केलेल्या तात्पुरत्या संघात एकाही ऑफर स्पिनरचा समावेश आहे. अनेक संघांमध्ये डावखुरे फलंदाज असल्याने अश्विनचा भारताला चांगल्याप्रकारे वर्ल्डकपमध्ये वापर करता येईल असं सांगितलं जात आहे. कर्णधार रोहित शर्मा देखील सुरुवातीपासूनच हेच सांगत आहे की, आमच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या नियोजनामध्ये अश्विनचा विचार सुरु आहे. त्यामुळेच अक्षर पटेल जायबंदी झाल्यानंतर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली. अश्विनने केलेली कामगिरी आणि दिर्घ काळानंतर अश्विनला संघात स्थान देण्यात आल्यावरुनच त्याला विश्वचषकाच्या संघातील दावा मजबूत मानला जात आहे.

जो संग राजकोटमध्ये खेळणार तोच...

भारताच्या वर्ल्डकपच्या संघात या एका बदलाबरोबरच राजकोटमधील एकदिवसीय सामन्यामध्ये आपल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल करण्याचीही संधी आहे. कारण वर्ल्डकप स्पर्धेआधी भारताचा हा शेवटचा सामना असेल. भारत मुख्य स्पर्धेआधी सराव सामने खेळणार आहे. मात्र या सामन्यांना फारसं महत्त्व नाही. त्यामुळेच शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो संघ खेळणार आहे तोच 8 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्या खेळताना दिसू शकतो. हा सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. त्यामुळेच राजकोटच्या सामन्यानंतर पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच आयसीसीकडे वर्ल्डकपसाठी संघ सोपवण्याच्या शेवटच्या दिवशीच नव्याने वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.