सूर्यकुमारच्या पहिल्या पत्रकार परिषदेला 2 पत्रकारांची हजेरी; रोहितच्या वेळेस होते 200 पत्रकार

Suryakumar Yadav First Press Conference As Captain: नुकताच वर्ल्ड कप संपला असून काही दिवसांमध्येच ही मालिका सुरु होत असल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 23, 2023, 01:05 PM IST
सूर्यकुमारच्या पहिल्या पत्रकार परिषदेला 2 पत्रकारांची हजेरी; रोहितच्या वेळेस होते 200 पत्रकार title=
बुधवारी सायंकाळी झाली ही पत्रकार परिषद

Suryakumar Yadav First Press Conference As Captain: वर्ल्ड कप 2023 संपल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. या मालिकेच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. कर्णधार म्हणून सूर्यकुमारची ही पहिलीच पत्रकार परिषद ठरली. आज होणारा सामना विशाखापट्टणममधील डॉ. व्हाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. वर्ल्ड कपच्या दीड महिन्यांच्या स्पर्धेनंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. टी-20 मधील अव्वल खेळाडू असलेल्या सूर्यकुमारकडे याच कारणामुळे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र कर्णधार म्हणून आपली पहिलीच पत्रकार परिषद घेणाऱ्या सूर्यकुमार यादवची पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं घडलं काय?

नुकताच वर्ल्ड कपचा फिव्हर उरण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच चारच दिवसांमध्ये नवीन मालिका सुरु होत असली तरी चाहत्यांमध्ये या मालिकेबद्दल फारशी उत्सुकता दिसत नाही. वर्ल्ड कपची फायलन हरल्याने चाहते निराश आहेत. या मालिकेबद्दल फारसा उत्साह दिसत नसल्याची झलक सूर्यकुमार यादवच्या पत्रकार परिषदेमध्येही पाहायला मिळाली. 22 नोव्हेंबर रोजी झालेली पत्रकार परिषद सूर्यकुमारला आयुष्यभर लक्षात राहील. अर्थात हे सकारात्मक दृष्टीने नसून नकारात्मक दृष्टीने म्हटलं जात आहे कारण या पत्रकार परिषदेला केवळ 2 पत्रकार उपस्थित होते. ही पत्रकार परिषद केवळ 3.32 मिनिटं चालली. पत्रकारांनी कर्णधार म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणाऱ्या सूर्यकुमारच्या कॉन्फरन्सकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.

नक्की वाचा >> 'मी सगळ्यांना एकच गोष्टी सांगितली, की...'; कॅप्टन सूर्यकुमारचा यंग टीम इंडियाला मोलाचा सल्ला

सूर्यकुमार झाला थक्क

रोहित शर्माने वर्ल्ड कप फायनलच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेला 200 पत्रकार उपस्थित होते. मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेला दोनच पत्रकार आल्याचं पाहून सूर्यकुमारलाही आश्चर्य वाटलं. तो पत्रकार परिषदेसाठी हॉलमध्ये आल्यानंतर थक्क झाला. या पत्रकार परिषदेतील 2 पत्रकारांपैकी एकाने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. जियो सिनेमाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओचा कालावधी केवळ 3.32 मिनिटांचा आहे.

नक्की वाचा >> 'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला

स्वार्थी होऊन खेळण्याचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेमध्ये तरुण खेळाडूंना संधी देण्यात आल्यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना सूर्यकुमारने हसत, 'मी सुद्धा तरुण आहे,' असं म्हटलं. "प्रत्येक खेळाडूला मैदानावर उतरल्यानंतर स्वार्थी होऊ न खेळावं लागेल, हे मी आताच स्पष्ट करु इच्छितो," असंही सूर्यकुमारने स्पष्ट केलं. तसेच वर्ल्ड कप फायनलमधील पराभव सहज विसरता येणार नाही असंही सूर्याने म्हटलं. "फायलनमध्ये झालेल्या या पराभवामधून सावरण्यासाठी वेळ लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जे काही झालं ते विसरुन जाऊयात, असं होत नाही. ही स्पर्धा फार मोठी होती," असं सूर्यकुमार म्हणाला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय टीम-

सूर्यकुमार यादव (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार