'जेव्हा तुमचं वय होतं तेव्हा कोणीच तुम्हाला...,' महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली खंत, 'ही नवी मुलं...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आयपीएल (IPL) खेळण्यासाठी फिट असणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं आहे. तसंच बाईक, कार आणि पाळीव प्राण्यांवर असणारं प्रेमही बोलून दाखवलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 21, 2024, 06:34 PM IST
'जेव्हा तुमचं वय होतं तेव्हा कोणीच तुम्हाला...,' महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली खंत, 'ही नवी मुलं...' title=

भारतीय क्रिकेट आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आगामी आयपीएल हंगामांसाठी फिटनेस किती गरजेचा असेल यावर भाष्य केलं आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे आयपीएलवर लक्ष्य केंद्रीत करत आहे. पण जसजसा हंगाम पुढे सरकत आहे तसतसं धोनीला आपला फिटनेस कायम ठेवणं अवघड जात आहे. यामुळे आता त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. 

टी-20 लीगमधील स्पर्धेबद्दल बोलताना धोनीने सांगितलं की, तरुण आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा असल्याने त्याला फिटनेसमध्ये सर्वोत्तम असण्याची गरज आहे. तुमचं वय जास्त आहे यासाठी कोणीही तुम्हाला सूट देत नाही. यावेळी धोनीने आपली ट्रेनिंग आणि खाण्याच्या सवयी याबद्दलही सांगितलं असून, सोशल मीडियावर नसल्याने कशाप्रकारे मदत होते याबद्दलही खुलासा केला. 

"सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे, मी वर्षभर क्रिकेट खेळत नाही. त्यामुळे मला फिट राहणं गरजेचं आहे. एकदा मी स्पर्धेत उतरलो तर माझ्यासमोर फिट असणारे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू असतात. व्यावसायिक खेळ सोपा नाही. कारण तिथे वय जास्त आहे म्हणून तुम्हाला कोणी सूट देत नाही. जर तुम्हाला खेळायचं असेल तर इतरांइतकंच फिट असायला हवं.  वय वाढत जातं तसतसं तुमची गती कमी होते. त्यामुळे खाण्याच्या सवयी, प्रशिक्षण अशा गोष्टी तुम्हाला मदत करतात. सुदैवाने मी सोशल मीडियावर नाही. त्यामुळे विचलित करणाऱ्या गोष्टी कमी आहेत," असं धोनीने सांगितलं आहे.

यावेळी धोनीने कशाप्रकारे बाईक्स आणि विटेंड कार त्याला तणाव कमी करण्यात मदत करतात याबद्दल सांगितलं. “एकदा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर मला माझ्या कुटुंबासोबत आणखी थोडा वेळ घालवायचा होता. पण, त्याच वेळी, मानसिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी, एकाग्र राहण्याची गरज होती. मला शेतीची आवड आहे, माझ्याकडे त्यासाठी मोटारसायकल आहेत. मी आता व्हिंटेज कारमध्ये आवड जोपासत आहे. या गोष्टी मला तणावमुक्त करतात. मी तणावग्रस्त असल्यास, कदाचित गॅरेजमध्ये जाईन, तिथे काही तास घालवले की मला बरं वाटतं. यानंतर मी परत येतो,” असं तो पुढे म्हणाला.

42 वर्षीय धोनीने यावेळी पाळीव प्राण्यांवरील प्रेमाबद्दलही सांगितलं. पराभव झाला असला तरी ते माझ्याशी सारखंच वागतात हे त्याने नमूद केलं. “मी लहानपणापासून नेहमीच पाळीव प्राण्यासोबत राहिलो आहे, मग ती मांजर असो वा कुत्रा. तरी मी कुत्र्याला प्राधान्य देतो. त्यांचे तुमच्यावर बिनशर्त प्रेम असते. मी मागील मुलाखतीत हे सांगितले आहे, जरी मी एक गेम हरलो आणि परत आलो तरी माझा श्वान मला त्याच प्रकारे भेटतो,” असं धोनी म्हणाला.