ODI WC 2023 : एका खेळीने सूर्याची वर्ल्ड कपमधली जागा पक्की, 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात

ODI WC 2023 : गेल्या 19 महिन्यात टीम इंडियात सूर्यकुमार यादवला अनेकवेळा संधी मिळाली. पण टी20 च्या या स्टारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याचं विश्वचषक स्पर्धेतील स्थानही धोक्यात आलं होतं. 

राजीव कासले | Updated: Sep 25, 2023, 04:41 PM IST
ODI WC 2023 : एका खेळीने सूर्याची वर्ल्ड कपमधली जागा पक्की, 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात title=

World Cup Team India Squad : मिस्टर 360, स्काय या नावाने क्रिकेट जगतात ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी20 क्रिकेटमध्ये नवनवे विक्रम केले. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र सूर्याला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या एकोणीस महिन्यात सूर्याला टीम इंडियात (Team India) अनेकवेळा संधी देण्यात आली. पण प्रत्येकवेळी तो अपयशी ठरला. यानंतरही सूर्याला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीच्या  (ODI World Cup 2023) भारतीय संघात स्थान देण्यात आलं. त्यावर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. पण आता विश्वचषक स्पर्धेला काही दिवस उरले असतानाच सूर्याने तुफानी खेळी करत टीम मॅनेजमेंटसमोर पुन्हा आपला दावा ठोकलाय. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवला केवळ दोनवेळा अर्धशतकी खेळी करता आली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव आतापर्यंत 29 सामने खेळला आहे. यात त्याला केवळ 659 धावा करता आल्या. मधल्या फळीत टीम इंडियाला चांगला फलंदाज मिळेल या दृष्टीने बीसीसीआयकडून सूर्याला संधी दिली जात होती. पण सूर्यकुमारला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यानंतरही चांगल्या खेळाडूंना डावलून सुर्यकुमारला विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान देण्यात आल्याने बीसीसीआयवर बरीच टीका झाली.

19 महिन्यांनंतर यश
मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला होता. सलग तीन सामन्यात सूर्यकुमार यादव गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर शुन्य धावांवर बाद झाला. पण ही सर्व कसर सूर्याने भरुन काढलीय. विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अखेर सूर्या तळपला. तीन दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सूर्याने सलग दोन अर्धशतकं ठोकली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सूर्यकुमारने धावसंख्या वाढवली. 

इंदौर एकदिवसीय सामन्यात सूर्याची लाजबाब खेळी पाहिला मिळाली. ज्याची क्रिकेटचाहते गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहात होते. सामन्याच्या 41 व्या षटकात येऊन सूर्याने तुफानी फलंदाजी केली. अवध्या 37 चेंडूत सूर्यकुमारने 72 धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला 399 धावांचा बलाढ्य स्कोर उभा करुन दिला. या खेळीने सूर्यकुमारला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. 

प्लेईंग XI मध्ये मिळणार संधी?
सूर्यकुमार यादव पुन्हा फॉर्मात आल्याने त्याला विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिआच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सूर्यकुमार यादवला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावलं लागेल, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या केएल राहुल, श्रेयस अय्यरने संघात आपली जागा निश्चित केली आहे. अशाच ईशान किशनची जागा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. विकेटकिपर म्हणून केएल राहुल संघात आहे. त्यामुळे सूर्याला संघात स्थान दिल्यास ईशान किशनला बाहेर बसावं लागणार आहे.